तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
atish-borele : शहराच्या राजकीय व विकासात्मक वाटचालीत शुक्रवार, 2 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरली. थेट जनतेतून निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आतिश बोरेले यांनी दुपारी अधिकृतपणे नप अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पांढरकवडा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी नगराध्यक्ष बोरेले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केळापूर येथील जगदंबा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात भाजपाचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नप अध्यक्ष बोरेले यांनी पांढरकवड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मास्टर प्लॅन’ राबविण्याची घोषणा केली. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते, शिक्षण, आरोग्य व सौंदर्यीकरण या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येणार असून पांढरकवड्याला पुन्हा एकदा ‘ग्रीन सिटी’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जनतेने दाखवलेला विश्वास कायम ठेवत गट-तट न पाहता सर्वांसोबत घेऊन शहराचा विकास केला जाईल. येत्या 100 दिवसांत विशेष कृती आराखडा राबवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमास आमदार राजू तोडसाम, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, भाजपाचे सहाही विजयी नगरसेवक, ज्येष्ठ नेते श्रीराम मेलकेवार, आनंद वैद्य, मंगेश वारेकर, सुनील बोकीलवार, गजानन बेजंकीवार, गजानन जुआरे, किशोर देशट्टीवार, ऋत्विक पोलाडीवार, सूरज चौधरी, संदीप बाजोरिया, बोरेले यांचे सर्व कुटुंबीय, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या नेतृत्वात पांढरकवड्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.