भाजपा व युवा स्वाभिमान मैत्रिपूर्ण लढणार

राणांच्या ‘फार्म हाऊस’वर पोहोचले भाजपाचे नेते

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
अमरावती, 
ravi-rana : भाजपा आणि युवा स्वाभिमान या दोन मित्र पक्षांचे उमेदवार एकमेकांविरूद्ध रिंगणात आल्याने महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे यांनी शुक्रवारी आमदार रवी राणा यांच्या ‘फार्म हाऊस’वर पोहचून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, रवी राणा यांनी आपले उमेदवार माघार घेणार नाहीत, असे सांगितल्याने या दोन पक्षांमध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे.
 

AMT 
 
 
भाजपने आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी ९ जागा सोडल्या होत्या, तरी युवा स्वाभिमानने ४१ जागांवर उमेदवार उभे केले. महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या विरोधात रवी राणा यांनी सचिन भेंडे या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. त्यामुळे राणा आणि भारतीय यांच्यातील पारंपरिक संघर्षाची ठिणगी पडली आहे. सचिन भेंडे हे महापालिकेचे कंत्राटदार असून ते निवडणुकीसाठी अपात्र ठरतात, अशी तक्रार तुषार भारतीय यांनी केली होती. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर असमाधान व्यक्त करीत तुषार भारतीय यांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला होता, पण भारतीय यांनी याचिका मागे घेतल्याने सचिन भेंडे हे रिंगणात कायम आहेत.
 
 
 
अनेक ठिकाणी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार समोरा-समोर आल्याने मतविभागणीचा धोका लक्षात घेऊन युवा स्वाभिमान पक्षाने माघार घ्यावी, यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रवी राणा यांच्या फार्म हाऊसवर पोहोचले. यावेळी भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे हेही उपस्थित होते. रवी राणांसोबत सुमारे दीडतास बंदद्वार चर्चा झाली. पण चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षात मैत्रिपूर्ण लढत राहील, असे युवा स्वाभिमान पक्षातर्फे जाहीर करण्यात आले.