'भारत नसता तर त्यांना लस ‘सूंघायलाही’ मिळाली नसती' : जयशंकरांचे मोठे वक्तव्य

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
चेन्नई,
S. Jaishankar : चेन्नई येथे शुक्रवारी आयआयटी मद्रासमध्ये परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारताची प्राचीन सभ्यता, लोकशाही, परराष्ट्र धोरण, कोविड काळातील लसीकरण धोरण आणि शेजारी देशांशी असलेल्या संबंधांवर सविस्तर भाष्य केले. कोविड महामारीच्या काळातील अनुभव सांगताना त्यांनी म्हटले की, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत लसींच्या वितरणाइतका भावनिक परिणाम जगभर कुठल्याही गोष्टीचा त्यांनी पाहिला नाही. अनेक देशांतील लोक आजही लसीची पहिली खेप आठवून भावूक होतात. कोविड हा अत्यंत कठीण काळ होता, मात्र भारताने तो यशस्वीपणे मागे टाकला, असे त्यांनी सांगितले.
 
 
S JAYSHANAKR
 
 
जयशंकर म्हणाले की त्या काळात विकसित पाश्चात्त्य देशांनी आपल्या लोकसंख्येपेक्षा आठपट जास्त लसींचा साठा करून ठेवला होता, पण लहान देशांना दहा हजार डोस देण्यासही तयार नव्हते. अशा परिस्थितीत भारताने १.४ अब्ज लोकसंख्येची जबाबदारी सांभाळत असतानाच लहान देशांना एक ते दोन लाख लसींचे डोस देऊन एकजूट आणि माणुसकी दाखवली. आज लॅटिन अमेरिका, कॅरिबियन आणि पॅसिफिकमधील लहान बेटांवरील देशांतील लोक म्हणतात की भारताने मदत केली नसती तर त्यांना लस ‘सूंघायलाही’ मिळाली नसती. भारत हा जगातील सर्वात सक्षम लस उत्पादक देशांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक सहकार्य आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हे अनेकांना समजत नाही, पण जगानेही गरजेच्या वेळी भारताला मदत केली होती, असे ते म्हणाले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न वेगळे न पाहता, घरात अडचण असली तरी जगाला मदत करणे आवश्यक आहे, कारण दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
बांगलादेशातील परिस्थिती आणि भारताच्या शेजारी देश धोरणाबाबत प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले की ते दोन दिवसांपूर्वीच बांगलादेश दौऱ्यावर गेले होते आणि माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले होते. भारताला विविध प्रकारचे शेजारी देश आहेत, पण जो शेजारी चांगला आहे किंवा किमान नुकसान करत नाही, त्याला मदत करणे हा भारताचा स्वभाव आहे. जिथे चांगल्या शेजारीपणाची भावना आहे, तिथे भारत गुंतवणूक करतो, मदत करतो आणि संसाधने शेअर करतो. कोविड काळात भारताच्या बहुतांश शेजारी देशांना पहिली लस भारताकडूनच मिळाली, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
ते पुढे म्हणाले की श्रीलंकेसारखे काही शेजारी देश अत्यंत कठीण काळातून गेले, तेव्हा भारताने आयएमएफ करार संथ असतानाही सुमारे चार अब्ज डॉलर्सचे मदत पॅकेज दिले. बहुतांश शेजारी देशांना हे उमगले आहे की भारताची प्रगती ही उचलणारी लाट आहे; भारत वाढला तर सर्वजण वाढतील. हाच संदेश आपण बांगलादेशला दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
जयशंकर यांनी भारताच्या ऐतिहासिक वारशावरही भाष्य करताना सांगितले की भारत हा जगातील मोजक्या प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे, जो आजही एक मोठा आधुनिक राष्ट्र म्हणून उभा आहे. आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे, कारण असा समृद्ध इतिहास फार थोड्या देशांकडे आहे. भारताने लोकशाही स्वीकारून लोकशाही ही संकल्पना जागतिक पातळीवर सार्वत्रिक केली. जर भारताने लोकशाही स्वीकारली नसती, तर ही संकल्पना काही मोजक्या प्रदेशांपुरतीच मर्यादित राहिली असती, असे ते म्हणाले. आपली विचारसरणी, मूल्ये, संस्कृती आणि इतिहास जगासमोर मांडणे हे आपले कर्तव्य आहे, मात्र ते मैत्रीपूर्ण भागीदारीतूनच करता येते. पाश्चात्त्य देशांशी भागीदारी महत्त्वाची असून, ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा अर्थ भारताने कधीच जगाकडे शत्रू किंवा धोका म्हणून पाहिले नाही, हाच असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.