कारंजा लाड,
Shalini Thakre, नगर परिषद कारंजा येथील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या बैठकीत भाजप गटनेतेपदी शालिनी प्रशांत ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. ही बैठक आमदार सई डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तसेच भाजपा वाशीम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे आणि महामंत्री राजीव काळे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
या बैठकीस नगर परिषदेमधील भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने व नगरपरिषदेमध्ये विकासाभिमुख भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी अनुभवी व सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज असल्याने शालिनी ठाकरे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. शालिनी ठाकरे यांनी यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून प्रभावी कामकाज केले आहे.
नुकत्याच झालेल्या Shalini Thakre, नगर परिषद निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मताधियाने विजय संपादन केला असून, गेल्या वीस वर्षांपासून स्व. प्रकाश डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाशी एकनिष्ठ राहून सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय अनुभवाची व संघटनात्मक बांधिलकीची दखल घेत त्यांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. निवडीनंतर बोलताना आमदार सई डहाके यांनी शालिनी ठाकरे यांचे अभिनंदन करत नगर परिषदेमध्ये जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडून विकासकामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच भाजपा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखालीकारंजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या निवडीमुळे नगर परिषद मध्ये भाजपचे नेतृत्व अधिक सक्षम झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.