ताम्हिणी घाटात खासगी बसचा भीषण अपघात : २० प्रवासी जखमी

५–६ जण गंभीर

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
रायगड,
tamhini ghat bus accident, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या ताम्हिणी घाटात आज सकाळी खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. पुण्याहून माणगावच्या दिशेने येणारी भरधाव बस घाटातील गारवा हॉटेल परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला जोरात धडकली. या अपघातात तब्बल २० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ५ ते ६ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

tamhini ghat bus accident,  
प्राथमिक माहितीनुसार, समोरून येणाऱ्या एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डोंगराला धडकली. धडकेनंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी बसच्या सीटमध्ये अडकले होते, तर काहींना गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
 
 
घटनेची माहिती मिळताच tamhini ghat bus accident माणगाव पोलीस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य सुरू करून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व जखमी प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली जात आहे.या अपघातामुळे काही काळ ताम्हिणी घाट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अपघाताचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
 
 
दरम्यान, जखमी प्रवाशांच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे लक्ष असून त्यांना सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली आहे.