मेलबर्न,
Canadian woman dies in Australia ऑस्ट्रेलियातील कागारी (पूर्वीचे फ्रेझर आयलंड) बेटावर १९ वर्षीय कॅनेडियन तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कागारीच्या पूर्व किनाऱ्यावरील माहेनो जहाजाच्या अवशेषांजवळ सोमवारी सकाळी हा मृतदेह सापडला. या तरुणीचा मृत्यू डिंगोच्या हल्ल्यामुळे झाला असावा का, याचा पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने पहाटे सुमारे ५ वाजता पोहण्यासाठी जाणार असल्याचे तिच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, सकाळी ६:३५ वाजता तिचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. समुद्रकिनाऱ्यावर एसयूव्हीने प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना मृतदेहाभोवती सुमारे १० डिंगो दिसून आले होते.
पोलिस निरीक्षक पॉल अल्गी यांनी सांगितले की, “तो प्रसंग अत्यंत भीषण आणि धक्कादायक होता. मृतदेहावर डिंगोच्या ओरखड्यांच्या खुणा आढळल्या आहेत.” तथापि, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणीचा मृत्यू बुडून झाला की डिंगोच्या हल्ल्यात झाला, याबाबत निश्चित निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बुधवारी मिळण्याची शक्यता आहे. सदर तरुणी गेल्या सहा आठवड्यांपासून कागारी बेटावरील एका पर्यटन वसतिगृहात काम करत होती. तिची एक कॅनेडियन मैत्रीणही तिच्यासोबत कार्यरत होती. या घटनेमुळे तिच्या मैत्रिणीला तीव्र मानसिक धक्का बसला असून ती समुपदेशन घेत आहे. पोलिस कॅनडामधील तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
कागारी हे जगातील सर्वात मोठे वाळूचे बेट असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. येथे सुमारे २०० डिंगो मुक्तपणे संचार करतात. कोविडनंतर पर्यटकांची संख्या वाढल्याने डिंगोंच्या वर्तनात आक्रमकता वाढल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. पर्यटकांनी डिंगोंजवळ जाणे किंवा त्यांना अन्न देणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, तीन वर्षांपूर्वी याच बेटावर जॉगिंग करणाऱ्या २३ वर्षीय महिलेला डिंगोंच्या टोळीने समुद्रात ओढले होते. मात्र, एका पर्यटकाच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला होता.