सांगली,
Accused in Pansare murder case dies कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. प्राथमिक माहिती नुसार, त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याची शक्यता आहे. काल मध्यरात्री गायकवाडच्या तब्येतीत अचानक त्रास सुरू झाला होता, त्यानंतर तातडीने त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले होते. उपचारादरम्यान सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक होता आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात प्रमुख संशयित मानला जात होता. 2015 मध्ये कोल्हापूर येथे पानसरे यांची हत्या झाली होती. गायकवाडला पानसरे हत्याकांडातील आरोपींपैकी दहा पैकी एक मानले जात होते. त्याला अटक झाल्यानंतर तुरुंगात ठेवण्यात आले, मात्र चार वर्षांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला आणि सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरी राहत होता. हत्येतील इतर आरोपींशी संबंध प्रस्थापित करण्यात गायकवाड महत्त्वाचा दुवा होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे या प्रकरणाच्या पुढील तपासावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गायकवाडच्या मृत्यूनंतर पानसरे हत्याकांडातील इतर आरोपी आणि घटनांचे सत्य समोर आणणे तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. सध्या या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि आरोपीच्या मृत्यूनंतर प्रकरणाचे स्वरूप व तपास यावर नवीन वळण येण्याची शक्यता आहे.