खामेनी सरकारची क्रूरता उघड; इराणमध्ये ४ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
तेहरान,
brutality of the Khamenei इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनांदरम्यान सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे चित्र समोर आले आहे. अमेरिकास्थित मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार, या निदर्शनांत सहभागी असलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत किमान ४,०२९ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीमुळे अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दडपशाहीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र टीका होत आहे.
 
 
iran andolan
 
मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अहवालानुसार, मृतांमध्ये ३,७८६ निदर्शकांचा समावेश असून १८० सुरक्षा दलातील सदस्य, २८ अल्पवयीन मुले आणि ३५ असे नागरिक आहेत जे थेट आंदोलनात सहभागी नव्हते. याच कारवाईत २६,००० हून अधिक लोकांना अटक करण्यात आल्याचेही या संस्थेने नमूद केले आहे. प्रत्येक मृत्यूची पुष्टी करण्यासाठी इराणमधील स्थानिक कार्यकर्त्यांच्या जाळ्यावर आधारित माहिती गोळा करण्यात आली असून प्रत्यक्ष आकडा याहून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या आकडेवारीची स्वतंत्रपणे पडताळणी करणे शक्य नसल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी स्पष्ट केले आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर इराणला आंतरराष्ट्रीय स्तरावरही झटका बसला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचात सहभागी होण्यासाठी इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्यात आले आहे. मंचाच्या आयोजकांनी सांगितले की, अलीकडील काळात इराणी नागरिकांच्या झालेल्या मोठ्या प्रमाणावरील मृत्यूच्या पार्श्वभूमीवर यंदा इराणी सरकारचे प्रतिनिधित्व योग्य ठरणार नाही. या निर्णयावर अराघची यांनी तीव्र आक्षेप घेतला असून इस्रायल आणि अमेरिकेतील त्यांच्या समर्थकांकडून आलेल्या राजकीय दबावामुळेच आपले निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच धर्तीवर म्युनिक सुरक्षा परिषदेनंही इराणी अधिकाऱ्यांना दिलेले निमंत्रण मागे घेतले आहे. इराणी सरकारकडून मृतांची अधिकृत संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, शनिवारी देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी निदर्शनांमध्ये अनेक हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले. या हिंसाचारासाठी त्यांनी थेट अमेरिकेला जबाबदार धरले. २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या आंदोलनांतील मृत्यूंच्या संख्येबाबत खामेनी यांनी प्रथमच सार्वजनिकरीत्या भाष्य केल्याचे मानले जात आहे.
 
दरम्यान, इराणमध्ये अटक करण्यात आलेल्या निदर्शकांपैकी काहींना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील सर्वाधिक मृत्युदंड देणाऱ्या देशांमध्ये इराणचा समावेश होतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष, न्यायपालिका प्रमुख आणि संसद सभापती यांनी संयुक्त निवेदन जारी करत हिंसाचारात थेट सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, मात्र दिशाभूल झालेल्या आणि गंभीर गुन्ह्यात सामील नसलेल्या लोकांबाबत दयाळू भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे.