कार दीना नदीत कोसळून दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
अहेरी, 
Car falls into Dina river एका बाजूला हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलेला असतानाच, त्याच मृतकाच्या अंत्यसंस्कारावरून परतणार्‍या नातलगांच्या कारला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार, 20 जानेवारी रोजी दुपारी घडली. बोरीनजिक दीना नदीच्या पुलावरून कार खाली कोसळल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत. सुनील मुरलीधर कोलपाकवार (65) रा. बोरी व यादव कोलपाकवार (67) अशी मृतकांची नावे असून, गंभीर जखमींमध्ये पद्मा सत्यनारायण कोलपाकवार (55), अर्चना यादव कोलपाकवार (60) आणि अभिजित यादव कोलपाकवार (35) यांचा समावेश आहे.
 
 
car
 
Car falls into Dina river मिळालेल्या माहितीनुसार, आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर आरडी गोळा करणारे रवींद्र तंगडपल्लीवार यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. आज (ता. 20) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी आष्टी आणि बोरी येथील त्यांचे नातलग आले होते. अंत्यसंस्कार आटोपून आष्टीकडे परत जात असताना बोरी जवळील दीना नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून नदीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. तर पद्मा, अर्चना व अभिजित कोलपाकवार या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 
एकाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर
रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या हत्येच्या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच, त्यांच्या अंत्यविधीला आलेल्या जवळच्या नातेवाईकांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती गेल्याने आणि तिघे गंभीर असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीचे पोलिस निरीक्षक हर्षल एकरे आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.