मुंबई,
cold weather will intensify in the state महाराष्ट्र सध्या तीव्र थंडीच्या लाटेतून तात्पुरता दिलासा मिळाल्यासारखा वाटत असला, तरी आता पुन्हा एक नवे हवामान संकट राज्यासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार दिसून येणार असून, त्यानंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत थंडीचा जोर तुलनेने कमी झाला असला, तरी पहाटे आणि रात्री गारवा जाणवत असून दुपारच्या वेळेस उष्णतेमुळे नागरिक हैराण होत आहेत. दरम्यान राज्यातील अंतर्गत भागांमध्ये मात्र थंडीची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. निफाड येथे राज्यातील सर्वात कमी तापमान ७.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, गोंदियात ९.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, गोंदिया आणि धुळे परिसरात गारठा कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत पहाटेच्या थंडीत लक्षणीय वाढ होणार असून, रात्री आणि पहाटे अधिक गारठा जाणवेल. विदर्भात ही थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असून नागपूर, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसा मात्र सूर्यप्रकाशामुळे काही प्रमाणात उब जाणवेल. पश्चिम महाराष्ट्रात दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावत कायम राहणार आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता जाणवेल. पुण्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंश, तर किमान तापमान १२ ते १५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही रात्री थंडी वाढणार असून दिवसा हवामान तुलनेने उबदार राहील. ग्रामीण भागांत पहाटे गारठा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून, कमाल तापमान २९ ते ३२ अंश आणि किमान तापमान १० ते १४ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. एकूणच राज्य सध्या थंडीच्या लाटेतून वाचले असले, तरी येत्या काही दिवसांत तापमानात पुन्हा घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईत पुढील काही दिवस कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातही हवामान साधारण असेल, मात्र दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवू शकतो. कोकण किनारपट्टीवर आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागात कमाल तापमान ३० ते ३२ अंशांदरम्यान, तर किमान तापमान १८ ते २२ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.