- निधी मिळत नसल्याच्या कारणावरून व्यक्त केली नाराजी
गोंदिया,
District Planning Committee विरोधी पक्षातील खासदारांनी सुचवलेल्या कामासाठी निधी मिळात नसेल तर आमचं काम काय ? असे बोलत काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी थेट नियोजन समितीच्या बैठकीत मंचावरुन उतरत जमिनीवर बसून नाराजी व्यक्त केली. मंगळवार २० जानेवारी रोजी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

District Planning Committee बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार डॉ. परीणय फुके, आ. विनोद अग्रवाल, अभिजित वंजारी यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सुचवलेल्या कामांना निधी मिळत नाही म्हणून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. प्रसंगी त्यांनी आमच्या कामांना निधी मिळणार का नाही? असा प्रश्न पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना विचारला. यावेळी पालकमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने खा. पडोळे यांनी आम्ही सुचवलेल्या कामांना निधी मिळत नसेल तर आमचं काम काय असे बोलून नियोजन समितीच्या बैठकीच्या मंचावरून सभागृहात खाली उतरले व जमिनीवर जाऊन बसले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पालकमंत्र्यांनी त्यांना निधी देऊ असा शब्द दिल्यानंतर पडोळे मंचावर जाऊन बसले. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारामुळे नियोजन समितीच्या सभागृहात काही काळापर्यंत गोंधळ उडालेला होता.