सहारनपूर,
Five murders in the same family उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सारसावा परिसरातील कौशिक विहार कॉलनीत एका बंद घरात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहांवर गोळ्या लागल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि घर उघडून तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत हे प्रकरण खून-आत्महत्येचे असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घर आतून बंद अवस्थेत होते आणि घटनास्थळी कोणतीही जबरदस्तीची चिन्हे आढळली नाहीत.
या घटनेत अशोक, त्यांची पत्नी अंजिता, आई विद्यावती तसेच दोन लहान मुले कार्तिक आणि देव यांचा मृत्यू झाला आहे. सर्वांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या असून घरातच तीन पिस्तुलं सापडली आहेत. अशोक हे तहसील कार्यालयात अमीन पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. शेजाऱ्यांची चौकशी केली जात असून कुटुंबाच्या आर्थिक, कौटुंबिक किंवा मानसिक तणावाच्या शक्यताही तपासात विचारात घेतल्या जात आहेत. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नेमके काय घडले याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे खरे कारण समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.