लॉईड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलची यशस्वी कामगीरी

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
गडचिरोली, 
गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी येथील लॉईड्स काली Lloyd's Kali Ammal Memorial Hospital अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वेळेवर व अत्याधुनिक क्रिटिकल केअर उपलब्ध झाल्यामुळे पारसलगुंडी गावातील एका मध्यमवयीन महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. रुग्णालय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला ऑर्गेनोफॉस्फरस विषबाधेमुळे 28 डिसेंबर 2025 रोजी अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली होती. बेशुद्ध अवस्था, तीव्र श्‍वसनास त्रास आणि फुफ्फुसांमध्ये गंभीर गुंतागुंत असल्याने तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी तात्काळ विषबाधेचे निदान करून आपत्कालीन जीवनरक्षक उपचार सुरू केले.
 
 
Memorial Hospital
 
रुग्णाला इंट्यूबेट करून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले व मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर अवलंबून राहिल्यामुळे पुढे ट्रॅकिओस्टॉमी करावी लागली. तब्बल 15 दिवस रुग्ण आयसीयूमध्ये उपचाराखाली होती. या काळात विषाच्या दुष्परिणामांमुळे मेंदू, हृदय व फुफ्फुसांसह अनेक अवयवांवर परिणाम झाला. तिला तीव्र फुफ्फुसातील सूज (अ‍ॅक्यूट पल्मोनरी एडिमा) झाली. तसेच सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियाचे दोन झटके आले. सतत निरीक्षण, प्रगत वैद्यकीय सुविधा आणि बहुवैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयामुळे रुग्णाने हळूहळू उपचारांना प्रतिसाद दिला. अखेर तिला यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले व प्रकृती स्थिर झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
 
 
Lloyd's Kali Ammal Memorial Hospital या संपूर्ण उपचारांचे नेतृत्व मेडिसिन तज्ज्ञ डॉ. चेतन, भूलतज्ज्ञ डॉ. धीरज आणि ईएनटी तज्ज्ञ डॉ. महेंद्र यांनी केले. उपचारांचे समन्वय वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. रुग्णालय प्रशासनाने एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांचे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधा असलेले रुग्णालय उभारल्याबद्दल आभार मानले. तसेच संचालिका श्रीमती कीर्ती रेड्डी यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वेळेवर उपचार, आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि समन्वयित टीमवर्क यांच्या जोरावर दुर्गम भागातही गंभीर रुग्णांचे प्राण वाचवता येतात, हे या घटनेतून अधोरेखित होत असल्याचे रुग्णालय अधिकार्‍यांनी नमूद केले.