मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत आईची साक्ष विश्वासार्ह

- उच्च न्यायालयाचे निरीक्षण - नराधम सावत्र बापाची जन्मठेप कायम

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
case of sexual assault पाच वर्षांच्या मुलीवर सावत्र बापाने मारहाण करीत पाशवी बलात्कार केला. या घटनेला तिची आई मुख्य साक्षीदार हाेती. मात्र, पीडित मुलीची आईच साक्षिदार असल्यामुळे तिची साक्ष ग्राह्य धरु नये, असा युक्तीवाद उच्च न्यायालयात करण्यात आला. मात्र, न्यायालयाने ‘मुलीवरील लैंगिक अत्याराच्या घटनेत आईची साक्ष विश्वासार्ह आहे.’ असे निरीक्षण नाेंदवून उच्च न्यायालयाने नराधम बापाची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्या.अनिल पानसरे आणि न्या.निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
 

उच्च न्यायालय  
 
 
अमरावती जिल्ह्यात एक महिला 5 वर्षांच्या मुलीसह राहत हाेती. तिने सूर्यभान (45) नावाच्या व्यक्तीबराेबर पुन्हा संसार थाटला. काही महिने सुरळीत गेल्यानंतर दारुचे व्यसन असलेल्या सूर्यभानची वाईट नजर पाच वर्षांच्या सावत्र मुलीवर गेली. ताे पत्नी घरी नसताना नेहमी तिच्याशी अश्लील वर्तन करीत हाेता. 27 एप्रिल 2018 राेजी पीडित मुलीची आई घराबाहेर गेली असताना संधी साधून परिस्थितीचा गैरायदा घेतला. मुलीला मारहाण केली आणि मुलीला पाेत्यात टाकून वर्धा नदीच्या काठावर नेले. जंगलात नेऊन तिच्या लैंगिक अत्याचार केला. तिला दमदाटी केली आणि घरी आणले. मात्र, लैंगिक अत्याचारामुळे मुलीला गंभीर जखमा झाल्या व रक्तस्राव सुरू झाला. हा प्रकार पत्नीच्या लक्षात आला. दुसऱ्या दिवशी आईने मुलीला घेऊन पाेलिस तक्रार दाखल केली. पाेलिसांनी तपास करुन आराेपपत्र दाखल केले. अमरावती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 2020 साली आराेपीला जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली. आराेपी पित्याने याविराेधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले.case of sexual assault एफआयआर उशिरा दाखल झाल्याचा आणि फसवणूक केल्याचा आराेपीचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. आराेपी घरातून पळून जाणे, त्याचे वर्तन आणि आई व मुलीच्या सुसंगत साक्षींमुळे दाेष स्पष्टपणे सिद्ध हाेत असल्याचे न्यायालयाने निर्णयात नमूद केले. प्रकरणातील पीडित मुलीची घटना-वर्णन तिच्या वयाला साजेशा साध्या भाषेत असली, तरी ती सुसंगत व विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
 
काय म्हणाले न्यायालय....
‘नातेवाईक साक्षीदार’ आणि ‘हितसंबंधित साक्षीदार’ यांमधील फरक स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने दाेघेही वेगवेगळे असल्याचा निवार्ळा दिला. एखाद्या प्रकरणाच्या निकालातून थेट लाभ हाेणारी व्यक्ती ‘हितसंबंधित साक्षीदार’ ठरते, तर केवळ नात्याने संबंधित असलेली व्यक्ती ‘नातेवाईक साक्षीदार’ असते. केवळ नातेसंबंध आहेत म्हणून साक्षीदाराची साक्ष नाकारता येणार नाही. अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत पीडित व तिच्या जवळच्या कुटुंबीयांची साक्ष केवळ नातेवाईक असल्याच्या कारणावरून फेेटाळता येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने पाच वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात सावत्र पित्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.