पंढरपुरात गूढ आवाजाने खळबळ; एकाच दिवशी दोन वेळा भूगर्भातून मोठा आवाज

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
पंढरपूर,
pandharpur loud noise विठुरायाच्या पंढरपुरात सोमवारी सकाळपासून गूढ आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच दिवशी दोन वेळा जमिनीखालून मोठा आवाज ऐकू आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. या घटनेमुळे काही भागांतील घरांच्या काचाही फुटल्याची माहिती आहे.
 

pandharpur 
 
 
पहिली घटना सकाळी सुमारे १० वाजून १५ मिनिटांच्या सुमारास घडली. अचानक जमिनीखालून जोरदार आवाज आल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. हा भूकंपाचा धक्का तर नाही ना, या भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. घटनेनंतर शहरात सर्वत्र पाहणी करण्यात आली, मात्र कुठेही स्फोट, अपघात किंवा अन्य कोणतीही ठोस घटना आढळून आली नाही. सकाळच्या धक्क्यातून नागरिक सावरत नाहीत तोच दुपारी सुमारे २ वाजून ३० मिनिटांनी पुन्हा एकदा गूढ आवाज ऐकू आला. यावेळी आवाजाची तीव्रता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जोरदार कडकडाटामुळे काही घरांच्या काचांना तडे गेले, तर काही ठिकाणी त्या फुटल्याचाही दावा करण्यात येत आहे. नेमका हा आवाज कुठून आणि कशामुळे आला, याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
भूकंप नाही, पण कारण काय?
तज्ज्ञांच्या मते, पंढरपूर हे दख्खनच्या पठारावर वसलेले असल्याने जमिनीखालील खडकांच्या थरांमध्ये नैसर्गिक हालचाली होत असतात. खडकांवर अचानक दबाव निर्माण झाला की, तो दबाव आवाजाच्या स्वरूपात बाहेर पडतो. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने रिश्टर स्केलवर त्यांची नोंद होत नाही, मात्र आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.
तसेच पावसाळ्यात जमिनीतील भेगांमधून पाणी खोलवर झिरपते. हे पाणी गरम किंवा खोलवर असलेल्या खडकांच्या संपर्कात आले की वाफ तयार होते आणि त्यामुळे हवेचा दाब वाढतो.pandharpur loud noise हा दाब अचानक बाहेर पडल्याने अशा प्रकारचे गूढ आवाज निर्माण होतात, असे शास्त्रज्ञ सांगतात. जमिनीखालील नैसर्गिक पोकळ्यांमुळेही अशा घटना घडू शकतात. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.