पिंपरी,
PCMC Election Results 2026 : पिंपरी महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. २०१७ मध्ये एकत्रित शिवसेनेने नऊ जागा जिंकल्या होत्या, तर यंदा शिंदेसेनेला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले. धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या उमेदवारांपैकी प्रभाग १६ मध्ये ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, नीलेश तरस; प्रभाग २४ मध्ये विश्वजित बारणे, नीलेश बारणे आणि प्रभाग १३ मध्ये सुलभा उबाळे यांनी विजय मिळवला.
पराभवाची मुख्य कारणे स्पष्ट आहेत. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांची उद्धवसेना आणि शिंदेसेनेत विभागणी झाली. शहरातील मराठी आणि कामगार वर्गात भाजपच्या विकासकामांचा प्रभाव जास्त राहिला, तर शिंदेसेनेची प्रचार यंत्रणा कमजोर ठरली. एकूण ५६ उमेदवार रिंगणात होते, पण बहुतेक ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. स्थानिक स्तरावर संघटनात्मक बांधणी नसल्यामुळेही पक्षाला नुकसान झाले.
संपूर्ण पॅनेल जिंकण्यात शिंदेसेने अपयशी ठरली. खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रभाव असलेल्या बालेकिल्ल्यात (प्रभाग २३ व २४)ही संपूर्ण पॅनेल निवडून आणता आले नाही. त्यांचा मुलगा विश्वजित बारणे ३,७११ मतांनी आणि पुतण्याने नीलेश बारणे ७,९९० मतांनी निवडून आले, मात्र भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) उमेदवारांनी शिंदेसेनेला मात दिली.
आयत्या वेळच्या उमेदवारांनाही फायदा झाला नाही. अनेक बंडखोरांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली, तरी त्यांच्या कामाचा परिणाम न दिसल्यामुळे ही निवडणूक पक्षासाठी आत्मपरीक्षणाची ठरली आहे. भाजपच्या वर्चस्वाखाली स्वतंत्र ओळख टिकवणे शिंदेसेनेसाठी आव्हान ठरले.