पुणे,
Pune Crime : शिरूर शहरात अमली पदार्थविरोधी कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय ४१, रा. डांबेनाला) याच्याकडून तब्बल २ कोटी १० लाख ४० हजार रुपये किमतीचा एक किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आला. या प्रकरणाने शिरूर परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस आणि शिरूर पोलीस स्टेशन यांच्या स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शेख मेफेड्रोनची विक्रीसाठी शिरूरमधील बाबुराव नगर परिसरात येणार आहे. पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत सुमारे २ कोटी १० लाख ४० हजार रुपये आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक करून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच, हा अमली पदार्थ कुठून आणला गेला आणि त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.