‘देवा’स आठवावे

    दिनांक :20-Jan-2026
Total Views |
 अग्रलेख... 
 
uddhav thackeray जवळपास तीन आठवड्यांपूर्वी एका पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा संयुक्त वचननामा जाहीर करताना घडलेला एक किस्सा वारंवार आठवावा अशा सुसंगत घटनांचा क्रम त्यानंतर सुरू झाला. राज आणि उद्धव ठाकरे हे पुरोगामी पक्षांच्या वळचणीस जाण्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्यांची मूळ मानसिकता सश्रद्ध अशीच आहे यात शंका नाही. कधी त्यांनी, राजकीय हितसंबंध जपण्यासाठी व मतांच्या अपेक्षेने हिंदुत्वाचा मुद्दा खुंटीवर ठेवण्याचीही तयारी केली, त्या अपेक्षेसाठी ते देवदेवतांबाबतच्या हिंदूंच्या भावनांवर प्रहार करतही असतात, पण कसोटीच्या क्षणी त्यांनाही देवाचीच आठवण होते, हा केवळ योगायोग नाही. म्हणूनच, त्या पत्रकार परिषदेत जेव्हा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांच्या एका आरोपाचा उल्लेख करून पत्रकारांनी ठाकरे बंधूंना प्रश्न विचारला, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केवळ दानवे यांची खिल्ली उडवून प्रश्न टोलविण्याचा प्रयत्न केला. पुढे दानवे यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला ही बाब निराळी, पण त्या प्रश्नावरील उद्धव ठाकरे यांच्या उत्तरानंतर माईक हातात घेऊन राज ठाकरे यांनी व्यक्त केलेले स्वत:चे मत मात्र, खूप काही बोलके ठरले. ‘कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देवाला द्यावीत, दानवाला नव्हे’, असे ते म्हणाले, तेव्हा त्यावर पत्रकारांमध्ये तात्पुरती खसखस पिकली, पण राज ठाकरे कोणत्या देवाला उत्तर देऊ इच्छितात, याचीही चर्चा सुरू झाली. त्याच दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या राज व उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतही राज ठाकरे यांना पडलेला प्रश्नदेखील पुढील घटनांचा संकेत देणारा ठरला.
 
 

उद्धव ठाकरे  
 
 
त्या मुलाखतीत एका प्रसंगापुरते व्यथित झालेले राज ठाकरे यांच्या मनात त्या वेळी देवाच्या अस्तित्वाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. सध्याचे राजकारण पाहता देवाचे अस्तित्व आहे असे वाटत नाही, असे काही मत त्यांनी व्यक्त केले. या दोघा भावांच्या मनात उद्भवणाऱ्या देवाच्या अस्तित्वाविषयीच्या शंका त्या त्या प्रसंगानुरूप उफाळून येतात, असे समोर येणाऱ्या परिस्थितीनुसार दिसते. कारण, त्याआधीही काही वेळा असेच घडले होते. भाजपासोबतची दीर्घकाळापासून युती सोडून काडीमोड घेतल्यानंतर महाविकास आघाडीत सामील होताना उद्धव ठाकरेंनी ‘शेंडी जानव्याचे हिंदुत्व’ म्हणत हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडविली तेव्हा कदाचित त्यांना हिंदूंच्या भावविश्वात देवाच्या अस्तित्वाचे महत्त्व किती आहे याचा तात्पुरता विसर पडलादेखील असेल, पण पुढे मुख्यमंत्रिपदाच्या काळात कोविडचा कहर माजल्यावर एका क्षणी मनात निर्माण झालेल्या हतबलतेच्या भावनेतून त्यांनाही देवाचीच आठवण झाली होती. महामारीचा कहर आणि आसपास माजलेले मृत्युभयाचे थैमान पाहून व्यथित झालेल्या उद्धव ठाकरे यांनी, ‘आता आपापल्या देवाचा धावा करा’ असा अगतिक सल्ला जनतेला दिला होता, हे अनेकांस आठवतही आहे. त्यामुळे, वरकरणी देवावर विश्वास नसल्याची भूमिका घेतानाही, मनाच्या अंतरंगातील देवावरील विश्वास त्यांना लपविता आलेला नाही, हेच स्पष्ट झाले आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांचा देवावर विश्वास आहे हे वेळोवेळी दिसूनही आले आहे. त्यांचा परिवारही देवावरच विश्वास ठेवतो, हेदेखील अनेकदा स्पष्ट झाले आहे. कुरुक्षेत्रावरील महायुद्धाच्या प्रसंगी रणांगणावर समोर उभ्या असलेल्या आप्तांना पाहून संभ्रमित झालेल्या अर्जुनाच्या त्या वेळच्या मानसिक अवस्थेची आठवण यावी, असाच संभ्रम देवाच्या अस्तित्वाविषयी राज ठाकरेंच्या मनात माजला असावा. देवदेवता आहेत की नाही असा प्रश्नदेखील राज ठाकरे यांना त्याच व्यथित मन:स्थितीतून पडला असावा. पण ज्यांची देवावर श्रद्धा असते, त्यांना अशा संभ्रमातून बाहेर काढण्याचे कामदेखील देवालाच करावे लागते. राज ठाकरे यांना देवाच्या अस्तित्वासंदर्भात शंका निर्माण होत होती, तेव्हाच त्यांच्या पत्नी मात्र, हातात जपमाळ घेऊन त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी मते मागत होत्या, याची नोंद जनतेने घेतली होती.
त्या मुलाखतीत राज ठाकरे यांना आणखी एक प्रश्न पडला होता. देवाचे अस्तित्व असेलच तर सध्याच्या राजकारणात तो गप्प राहून बघत का बसला आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. पण भक्तांसोबत वागण्याची देवाची रीत वेगळीच असते. भक्तांना पाहिजे तेव्हा देवाचा प्रतिसाद मिळत नसतो, तर देवाच्या मनात असेल तेव्हाच भक्ताला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातात, यावर सश्रद्ध हिंदूंचा विश्वास असतो. दुसरे म्हणजे, देवाच्या मनात असतील, तशाच गोष्टी घडत असतात, असेही सश्रद्ध समाज मानतो. देवाच्या मनात असेल तेच घडणार असेल तर तेथे कोणाचेही काहीही चालत नाही, याची जाणीवही या समाजात रुजलेली असते. देवाच्या अस्तित्वाविषयी शंका व्यक्त करणारी ती मुलाखत पूर्ण झाल्यानंतर काही काळातच राज व उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह देवाच्या दर्शनासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या मनातील देवाविषयीच्या शंका संपल्या असाव्यात याची खात्री समाजमाध्यमावरील अनेकांस पटली. हा प्रश्न विचारून राज आणि उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह मुंबादेवीचे दर्शन घेतल्याची छायाचित्रे आणि बातम्या झपाट्याने माध्यमांत झळकल्या आणि देवाचे दर्शन घेणे हा हिंदू परंपरेचाच एक भाग असल्याच्या जाणिवेने सश्रद्ध समाजात समाधान पसरले. राज ठाकरे यांचा देवावर विश्वासच आहे याची खात्री देणारे अनेक प्रसंग याआधी घडले आहेत. तीन वर्षांपूर्वी, फेब्रुवारी 2023 मध्ये पनवेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राजभाषा संमेलनातील एका मुलाखतीत, देवाच्या अस्तित्वाविषयी राज ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला होता. ‘आपल्याकडची शहरे एवढी बकाल झाली असूनही त्यांचा कारभार सुरळीत सुरू आहे हे पाहिले की देवाच्या अस्तित्वाची खात्री पटते’, असे उद्गार त्या मुलाखतीत राज ठाकरे यांनीच काढले होते.
तसे पाहिले, तर ठाकरे बंधूंचा देवावर विश्वास आहे किंवा नाही हा प्रश्न सामाजिक चर्चेचा व्हावा एवढा काही महत्त्वाचा नाही. ज्यांच्या मनात मुळातच या प्रश्नाविषयीचा संभ्रम आहे, उत्तरांच्या शोधात जे स्वत:च चाचपडत आहेत, जे स्वत:च कधी देवावर विश्वास ठेवून काम करतात आणि कधी देवाच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित करतात, त्यांच्या संभ्रमित मनाचे नेमके उत्तर शोधणे अन्य कोणासही अवघडच असते. ठाकरे बंधूंच्या मनातील या प्रश्नाचे उत्तरही तसेच काहीसे अवघडच आहे. सोयीनुसार देवावर विश्वास किंवा अविश्वास दाखविणे ही राजकारणातील अपरिहार्यतादेखील असावी. म्हणूनच, हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या एखाद्या पवित्र दिवशी आग्रहाने मांसाहार करणे, मांसाहार केल्याचे कारण देत मंदिरात जाण्याची टाळाटाळ करणे अशा तात्कालिक कृतींमधून जाणीवपूर्वक प्रसिद्धी मिळविणारे अन्य काही राजकीय नेतेदेखील पाहावयास मिळतात. जनतेच्या भावनांचा लाभ घेण्याच्या राजकीय फायद्यातोट्यांची गणिते आखून, त्या त्या वेळी काही भूमिका घेणाऱ्यांच्या मनात येणारे प्रश्न हा मुळात त्यांचा संभ्रम नसतो, तर समाजास संभ्रमित करण्याचा प्रयत्न असतो.uddhav thackeray जेव्हा जी भूमिका सोयीची वाटते, तेव्हा ती घेऊन समाजाच्या भावनांवर स्वार होण्याच्या राजकारणाचा तो भाग असतो. म्हणूनच मांसाहाराचे समर्थन करणाऱ्यांनाही, त्या वेळेची गरज पाहून त्यानुसार आपल्या आस्तिकतेची खात्री पटवून देण्याकरितादेखील आटापिटा करावा लागतो. देवाच्या मनात काय आहे हे ओळखता येत नाही ही सश्रद्ध समाजाने मान्य केलेली समजूत आहे. त्यास कोणी अंधश्रद्धा म्हणतात, तर कोणास हीच खरी श्रद्धा आहे असे वाटते.
आता महापालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. महापौर निवडीबाबत राजकीय पक्ष आपापली राजकीय समीकरणे आखू लागले आहेत. उभ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि सर्वांत मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी धूर्तपणाने कौल दिलेला असल्याने, महापौर निवडीच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांची कसोटी सुरू झाली आहे. अशा कोणत्याही कसोटीच्या क्षणी देवाची आठवण व्हावी हादेखील सश्रद्धतेचाच पुरावा असतो. साहजिकच, उद्धव ठाकरे यांनाही देवाची आठवण झाली आहे. ‘देवाच्या मनात असेल तर’ असे म्हणत त्यांनी आपली राजकीय इच्छा उघड केल्याने, आता देवाकडून काय कौल दिला जातो, हे पाहण्यासाठी जनता उत्सुक झाली आहे. त्यांची ही इच्छा देवापर्यंत पोहोचलेली असावी, असे त्यानंतरच्या काही घडामोडींतून दिसू लागले आहे. मात्र, देवाच्या मनात काय आहे, हे कोणालाच कळत नाही आणि देवाच्या मनात काही असेलच, तर तेथे कोणाचेच काही चालतही नाही. ही मात्र अंधश्रद्धा नाही!