*नावीन्यपूर्ण अभियानाची घेतली दखल
*प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील परेड संचलनात विशेष अतिथी
आर्वी,
आदर्श ग्राम संसद मिर्झापूर नेरी येथील Sarpanch Bala Sonatake सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळा सोनटके यांना केंद्र सरकारने दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता २६ जानेवारीला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण मिळाले असून याबाबतचे अधिकृत पत्र ग्रामपंचायतला प्राप्त झाल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे ग्रामपंचायत अधिकारी संजय यावले यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार्या प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनात विशेष परेड करिता विशेष अतिथी म्हणून सहपरिवार सहभागी होणार आहेत.

दिल्ली येथे आयोजित ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता संपूर्ण भारतातून ग्राम स्तरावर विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या सरपंचांना विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या १६ सरपंच महोदयामध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुयातील ग्रामपंचायत मिर्झापूर नेरीचे Sarpanch Bala Sonatake सरपंच बाळा सोनटके यांचा समावेश आहे. आदर्श ग्राम संसद मिर्झापूर नेरीचे सरपंच बाळा सोनटके हे सहपरिवार दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून आमदार सुमित वानखेडे यांनी सरपंच बाळा सोनटके यांचे विशेष अभिनंदन केले. मिर्झापूर नेरी ग्रामपंचायतीने त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव पारित केलेला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या माध्यमातून बाळा सोनटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा संवाद साधून गावाची यशोगाथा कथन केली होती, हे विशेष.