अनुष्का मृत्यू प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवा

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : आंदोलनाचा इशारा

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
fast track court लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील अनुसूचित जाती (मातंग) विद्यार्थिनी अनुष्का किरण पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करून ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात खटला चालविण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी विकास मीना यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सकल मातंग समाज यवतमाळ तथा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने अत्यंत गंभीर, संवेदनशील व सामाजिक न्यायाशी निगडित प्रकरणाबाबत निवेदन देण्यात आले. 14 वर्षीय विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिचा मृत्यू हा पूर्णतः संशयास्पद असून, या प्रकरणात प्राथमिक तपास अपुरा, दिशाभूल करणारा व संशयास्पद स्वरूपाचा दिसून येत आहे.
 
 

फास्ट track  
 
 
मृत्यूमागे मानसिक छळ, भेदभाव, दुर्लक्ष अथवा संस्थात्मक निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची ठोस शंका असून, हा प्रकार या विद्यार्थिनीवर झालेला अन्याय व अत्याचार म्हणून पाहिला गेला पाहिजे. हे प्रकरण हे अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत दखलपात्र असून, त्यातील विशेष कलमेही लागू होतात. असेच भारतीय दंड संहितेतीलसुद्धा अनेक कलमे लागू होतात, असे या निवेदनात म्हटले आहे.fast track court असेच या प्रकरणात सार्वजनिक सेवकांकडून कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा व कायदेशीर कर्तव्य न पार पाडणे, तसेच या प्रकरणात भारतीय दंड संहितेतील तपासाअंती लागू होणारी विविध कलमेसुद्धा लागू होण्याची पूर्ण शक्यता आहे, असेही म्हटले आहे. तरी मृत्यू प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार तत्काळ गुन्हा नोंदवण्यात यावा, या प्रकरणाची राज्यस्तर स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, दोषींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, पीडित कुटुंबास एससी, एसटी कायद्यानुसार तत्काळ आर्थिक मदत, संरक्षण व पुनर्वसन देण्यात यावे, अशाही मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
दोषी अधिकारी, कर्मचारी अथवा संस्था व्यवस्थापनावर कलम 4 अंतर्गत कारवाई करण्यात यावी, संपूर्ण तपास प्रक्रिया पारदर्शक ठेवून सत्य जनतेसमोर जाहीर करण्यात यावे, निवेदनाची तत्काळ व गंभीर दखल घेतली गेली नाही, मातंग समाज शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उग्र व व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.