एका चुकीच्या रिपोर्टमुळे वाद; पुरुष रुग्णाला ‘गर्भाशय’ असल्याचा दावा

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
सतना, 
male-patient-to-have-uterus पोटदुखीच्या तक्रारीमुळे तपासणीसाठी गेलेल्या एका पुरुष रुग्णाला सोनोग्राफी अहवाल पाहून जबर धक्का बसला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वैद्यकीय अहवालात चक्क पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याचा उल्लेख करण्यात आल्याने वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
 
male-patient-to-have-uterus
 
सतना जिल्ह्यातील उचेहरा नगर पंचायतीचे अध्यक्ष निरंजन प्रजापति गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीने त्रस्त होते. वेदना वाढत असल्याने त्यांनी 14 जानेवारी रोजी शहरातील एका नामांकित डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी तपासणी करून घेतली. मात्र तपासणीचा अहवाल हातात पडताच त्यांना धक्काच बसला. male-patient-to-have-uterus अहवालात 47 वर्षीय निरंजन प्रजापति यांच्या शरीरात ‘यूट्रस’ म्हणजेच गर्भाशय असल्याचे नमूद करण्यात आले होते, तेही ‘उलट्या स्थितीत’ असल्याचा उल्लेख होता. एका पुरुषाच्या सोनोग्राफी अहवालात गर्भाशय असल्याचे निदान झाल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला. निरंजन प्रजापति हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे ही बाब काही वेळातच संपूर्ण जिल्ह्यात पसरली. चुकीच्या अहवालामुळे त्यांना मानसिक धक्का बसला असून वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणी प्रजापति यांनी संबंधित डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ. अरविंद सराफ यांच्याकडे जाब विचारला असता, त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण देण्यास नकार दिला. डॉक्टरांनी मौन बाळगल्यामुळे संशय अधिकच बळावला असून, हा प्रकार वैद्यकीय निष्काळजीपणाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. male-patient-to-have-uterus आपली बदनामी झाल्याचा तसेच चुकीच्या अहवालामुळे मानसिक त्रास झाल्याचा आरोप करत निरंजन प्रजापति यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत सतना जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. मनोज शुक्ला यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चुकीचा सोनोग्राफी अहवाल देण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली असून तपासानंतर संबंधित डायग्नोस्टिक सेंटरवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एका लोकप्रतिनिधीच्या बाबतीत इतकी गंभीर चूक होऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या बाबतीत काय होत असेल, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. अशा चुकीच्या वैद्यकीय अहवालांमुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.