8 वर्षांची मनस्वी करणार 50 किमी स्केटिंग

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
पांढरकवड्याहून वणीला जाणार

पांढरकवडा, 
मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील व सध्या पुण्यात कोंढवा (बु) येथे राहणारी 8 वर्षीय मनस्वी विशाल पिंपरे पांढरकवडा ते वणी हे 50 किमी अंतर शनिवार, 24 जानेवारीला स्केटिंग करून पार करणार आहे. दरवर्षी मनस्वी आपल्या स्केटिंग उपक्रमातून सामाजिक संदेश देत असते. याहीवर्षी ती स्केटिंगद्वारे ‘Fit Sports and Unity’ ‘फिट स्पोर्टस् अ‍ॅन्ड युनिटी’ हा सामाजिक संदेश देणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पांढरकवडा नगर परिषदेच्या विशेष सहकार्याने मनस्वी ही 50 किमी स्केटिंग मोहीम पूर्ण करणार आहे.
 

manasvi 
 
‘Fit Sports and Unity’  स्केटिंग रॅलीची सुरुवात पांढरकवडा नगर परिषदेपासून सकाळी 7 वाजता होऊन सकाळी 11 वाजता शिवाजी पुतळा वणी येथे समारोप होणार आहे. दरम्यान पांढरकवडा ते वणी मार्गावर अनेक गावात, ग्रामस्थ, सेवाभावी संस्था, शाळा तसेच महाविद्यालयांकडून मनस्वीला प्रोत्साहन देण्याकरिता ठिकठिकाणी तिचे स्वागत करण्यात येणार आहे. आजच्या युवा पिढीला खेळाकरिता प्रोत्साहित करण्याकरिता तसेच 2036 मध्ये भारतात होऊ घातलेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेला लक्षात ठेवून मनस्वी पिंपरे विशेष संदेश देत आहे. मनस्वीच्या स्केटिंग रॅलीसाठी तिचे प्रशिक्षक विजय मलजी यांचे मार्गदर्शन राहणार आहे. रॅलीकरिता बोटोणी येथील युवक, तसेच मारेगाव व वणी येथील विविध पत्रकार संघटनांचे विशेष योगदान राहणार आहे. मनस्वीच्या या ऐतिहासिक स्केटिंग रॅलीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
अष्टपैलू स्केटिंगपटू
मनस्वी विशाल पिंपरे ही जागतिक विक्रमवीर, नॅशनल स्केटिंग चॅम्पियन 2023, 2025, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, सुवर्णपदक शतकवीर, अनेक राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर 22 विविध पुरस्कार प्राप्त अष्टपैलू स्केटिंगपटू आहे. तिने या अगोदर 2024 यावर्षी ‘बेटी बचाओ : बेटी पढाओ’करिता बोटोणी ते मारेगाव सलग 12 किमी स्केटिंग, 2025 यावर्षी ‘स्केट फॉर युवा’करिता बोटोणी ते वणी सलग 30 किमी स्केटिंग केली आहे.