पाकिस्तानचे संरक्षण मंत्री फसले...पाकिस्तानात बनावट पिझ्झा हटचा गोंधळ

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistan's Defense Minister failed पाकिस्तान पुन्हा एकदा हास्यास्पद कारणामुळे चर्चेत आला असून यावेळी थेट देशाच्या संरक्षण मंत्र्यांमुळेच स्वतःची खिल्ली उडाली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट येथे एका पिझ्झा हट फ्रँचायझीचे उद्घाटन केले, मात्र ही फ्रँचायझी अधिकृत नसून बनावट असल्याचे नंतर उघडकीस आले. या घटनेनंतर पाकिस्तानमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोशल मीडियावर जोरदार टीका आणि खिल्ली उडवली जात आहे. भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तान याआधीही दहशतवाद, आर्थिक संकट, दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र यावेळी संरक्षण मंत्र्यांनीच केलेल्या या गोंधळामुळे देशाची प्रतिमा पुन्हा एकदा हास्याचा विषय ठरली आहे. ख्वाजा आसिफ सियालकोटमध्ये पिझ्झा हटच्या नावाने सुरू झालेल्या एका रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. त्यांनी रिबन कापले, उद्घाटन केले आणि त्याचे फोटोही सार्वजनिक झाले.
 

Pakistan 
मात्र उद्घाटनानंतर काही वेळातच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पिझ्झा हट पाकिस्तानने अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केले की सियालकोट कॅन्टोन्मेंटमधील संबंधित रेस्टॉरंटला पिझ्झा हटच्या नावाने किंवा ब्रँडिंगखाली काम करण्याची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. कंपनीने सांगितले की त्यांच्या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करून एक अनधिकृत आउटलेट सुरू करण्यात आले आहे. पिझ्झा हट पाकिस्तानने पुढे स्पष्ट केले की सध्या देशात एकूण १६ अधिकृत आउटलेट्स कार्यरत असून त्यापैकी १४ लाहोरमध्ये आणि दोन इस्लामाबादमध्ये आहेत. ग्राहकांनी कोणतेही आउटलेट अधिकृत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती तपासावी, असेही आवाहन करण्यात आले.
 
 
ही माहिती समोर येताच सियालकोटमध्ये उद्घाटन करण्यात आलेली फ्रँचायझी पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. संरक्षण मंत्री स्वतः अशा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना फसवले गेले, हे उघड होताच सोशल मीडियावर ख्वाजा आसिफ यांना जोरदार ट्रोल करण्यात आले. अनेकांनी पाकिस्तानमधील प्रशासनिक हलगर्जीपणा आणि मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपहासाचा विषय ठरला आहे.