'फ्रॅक्टल डायनामिक्स'मुळे उत्पादनांची सुरक्षा; नागपूर विद्यापीठातील संशोधनाला जागतिक मान्यता

    दिनांक :21-Jan-2026
Total Views |
नागपूर,  
product-safety-through-fractal-dynamics उत्पादनांच्या सुरक्षा मानकांना अधिक सुरक्षितता बळकट करणारे संशोधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले आहे. 'फ्रॅक्टल डायनामिक्स' प्रणालीचा वापर करीत ३ डी प्रिंटिंग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या या डिझाईनला पेटंट प्राप्त झाल्याने विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढला आहे.
 
 
product
 
विद्यापीठाच्या स्वायत्त शैक्षणिक विभागात तसेच संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा या संशोधनात सहभाग आहे. यामध्ये डॉ. नवल रमेश साबे, डॉ. कैलास रघुनाथ बोरगडे, विलास रत्नपा हिरणवाळे, शुभम दयाराम घुमडे, डॉ. विजय रामकृष्ण राघोर्ते आणि यजुर्वेद नरहरी सेलोकार अशी पेटेंट प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. 'इंटेलिजंट एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ॲप्रेटस युजिंग नॉनलिनियर फ्रॅक्टल डायनामिक्स' (Intelligent Additive Manufacturing Apparatus Using Nonlinear Fractal Dynamics) असे नाविन्यपूर्ण संशोधनाचे नाव आहे. या संशोधनास युनायटेड किंगडमच्या इंटरॅक्च्युअल प्रॉपर्टी कार्यालयाकडून अधिकृत डिझाईन संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग अर्थात ३ डी प्रिंटिंग क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संशोधन मानले जात असून नॉन लिनियर फ्रॅक्टल डायनामिक्सवर आधारित बुद्धिमान उत्पादन प्रणाली या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. या यंत्रणेमध्ये मॅंडेलब्रॉट आणि ज्युलिया सेट्स सारख्या गणितीय संकल्पनांचा वापर करण्यात आला आहे. उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म रचनांमध्ये (मायक्रो - स्ट्रक्चर्स) अनुकूल बदल करता येतात ज्यामुळे योग्य वेळी संरचनात्मक ऑप्टिमायझेशन शक्य होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ऑप्टिमायझेशन, डायनामिक टूलपाथ मॉड्युलेशन तसेच फ्रॅक्टल आधारित एनक्रीप्शन यांचा समावेश असल्याने ही प्रणाली उच्च कार्यक्षम अचूक आणि नक्कल न करता येणारी उत्पादने निर्माण करण्यास सक्षम ठरते. या संशोधनामध्ये भौतिकशास्त्र, गणित, अभियांत्रिकी आणि जैविक विज्ञान या विविध क्षेत्रातील तज्ञांचे आंतर विद्याशाखीय सहकार्य लाभले आहे. product-safety-through-fractal-dynamics यामधील डॉ. नवल रमेश साबे हे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असून त्यांनी गणितीय मॉडलिंग आणि फ्रॅक्टल डायनामिक्सच्या माध्यमातून या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे भविष्यकालीन तंत्रज्ञानात प्रगत उत्पादन प्रक्रिया एरोस्पेस, जैववैद्यकीय उपकरणे, संरक्षण, तंत्रज्ञान आणि अचूक अभियांत्रिकी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्याची शक्यता आहे. भारतीय शैक्षणिक संशोधनाची जागतिक पातळीवरील उपस्थिती या संशोधनाच्या माध्यमातून अधिक दृढ होत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्यासागर अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे यांनी संशोधन पथकाचे कौतुक केले आहे.