शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण
गोंदिया,
राज्यभर खळबळ उडविणार्या School ID scam case शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात एसआयटीच्या विशेष पथकाने तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील एका खाजगी अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिलेशकुमार छबीलाल कटरे (४४), रा. गोरेगाव, रूपाली बिहारीलाल रहांगडाले (४०) आणि भाऊराव मधुकर मालधे (५६), दोघेही रा. तिरोडा यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूल तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला अटकेतील आरोपी पराग नानाजी पुडके (३३), रा. शारजा भवन, खेडेपार रोड, लाखनी, जि. भंडारा याने ओंकार मल्टीपरपज एज्युकेशन सोसायटीच्या नावाने बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करून शिक्षक पदाचे बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार केले.
School ID scam case प्रत्यक्षात पुडके कधीही त्या शाळेच्या आस्थापनेवर नव्हता किंवा शाळेत कार्यरतही नव्हता. तरीसुद्धा, बनावट अनुभव प्रमाणपत्रांच्या आधारे त्याने शालार्थ आयडी मिळविण्याचा प्रयत्न केला. हा प्रस्ताव रद्द करण्याबाबत शिक्षण विभागाच्या उपसंचालक उल्हास नरड यांना कळविण्यात आले असतानाही, प्रस्ताव रद्द न करता उलट पुडकेला मदत करून त्याला शालार्थ आयडी मिळवून देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. पुडके व नरड यांनी संगनमताने बनावट दस्तावेजांच्या आधारे शासनाचा निधी लाटत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून यापूर्वी १७ जणांना अटक करण्यात आली होती. पुढील तपासात दिलेशकुमार कटरे, रुपाली रहांगडाले व भाऊराव मालधे यांनाही बोगस शालार्थ आयडी मिळवून दिल्याचे उघड झाल्याने सोमवारी (१९ जानेवारी) त्यांना अटक करण्यात आली. सध्या तिघांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या घोटाळ्यात आणखी काही अधिकारी व शिक्षकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, लवकरच त्यांही अटक करण्यात येणार असल्याचे तपास अधिकार्यांनी सांगितले आहे.