मुंबई,
ssc-2026-hall-ticket-released महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी 2026 च्या परीक्षेची हॉल तिकीटे 19 जानेवारी रोजी जाहीर केली आहेत. दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. ही हॉल तिकीटे mahahsscboard.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली असून, शाळांनी ती डाउनलोड करून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना वितरित करायची आहेत.

हॉल तिकीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. मात्र विद्यार्थ्यांनी एक गोष्ट आवर्जून तपासून घ्यावी लागणार आहे. शाळेकडून दिलेल्या प्रवेशपत्रावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि अधिकृत शिक्का असणे आवश्यक आहे. स्वाक्षरी व शिक्का नसलेले हॉल तिकीट परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी शाळांनी प्रथम अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जावे. त्यानंतर ‘Latest Notifications’ विभागातील SSC लिंकवर क्लिक करावे. पुढे खाली स्क्रोल करून ‘Login for Institute’ हा पर्याय निवडावा. SSC विभागाखालील ‘Sign in Here’ वर क्लिक केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे. ssc-2026-hall-ticket-released त्यानंतर रोल नंबरची श्रेणी निवडून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करता येईल आणि त्याची प्रिंट काढता येईल.
दरम्यान, हॉल तिकीटावर विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा इतर वैयक्तिक माहितीमध्ये काही चूक आढळल्यास संबंधित शाळेने तात्काळ दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी निर्धारित शुल्क भरून ‘Application Correction’ या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. विभागीय मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्त केलेले हॉल तिकीट ‘Correction Admit Card’ या पर्यायातून उपलब्ध करून दिले जाईल. ssc-2026-hall-ticket-released विषय किंवा शिक्षणाच्या माध्यमाशी संबंधित बदल थेट विभागीय शिक्षण मंडळाकडे कळवावे लागतील. तसेच, हॉल तिकीटावरील विद्यार्थ्याचा फोटो अस्पष्ट असल्यास शाळेने योग्य फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का मारून ते प्रमाणित करणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.