तेलंगणा,
Stray dogs killed by poisoning तेलंगणामध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या निर्घृण हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रंगारेड्डी जिल्ह्यात तब्बल १०० कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. हैदराबादपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याआधीही तेलंगणामध्ये सुमारे ५०० कुत्र्यांच्या हत्येचा प्रकार समोर आला होता, त्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात गावातील सरपंचाच्या सांगण्यावरून ही कृत्ये करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक तपासात कुत्र्यांना व्यावसायिक पद्धतीने विष देण्यात आल्याचे संकेत मिळाले असून या प्रकरणात सरपंचासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की सरपंच, एक वॉर्ड सदस्य आणि ग्राम सचिव यांच्या सहभागाचीही चौकशीत नोंद झाली आहे. स्ट्रे अॅनिमल्स फाउंडेशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी मुदावत प्रीती यांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यातील कलम ३(५) आणि ११(१)(अ)(i) अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही घटना १९ जानेवारी रोजी घडल्याचे समोर आले असून, कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्यानंतर त्यांचे मृतदेह गावाबाहेर पुरण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या संदर्भात तपास करताना पोलिस मृतदेह पुरलेल्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी नंदेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, प्रकरणाची गंभीरतेने चौकशी सुरू असून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे.
दरम्यान, मुदावत प्रीती यांनी सांगितले की गावातून अचानक मोठ्या संख्येने कुत्रे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत गावकऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी वेगवेगळी आणि परस्परविरोधी उत्तरे दिली, त्यामुळे संशय अधिक गडद झाला. कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन ठार मारण्यात आले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. पुढे वॉर्ड सदस्य अदुलपुरम गौतम यांनीही कुत्र्यांना आधी भूल देण्यात आली आणि त्यानंतर विषारी पदार्थ टोचून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती दिली. या घटनेमुळे प्राणीहक्क कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

