वॉशिंग्टन,
Trump's plane malfunctions अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एअर फोर्स वन या विशेष विमानात मंगळवारी तांत्रिक बिघाड आढळल्याने दावोस दौऱ्यापूर्वीच विमानाला परतावे लागले. स्वित्झर्लंडकडे उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान जॉइंट बेस अँड्र्यूज येथे परत आले. या घटनेमुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीविट यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, विमानातील कर्मचाऱ्यांना किरकोळ विद्युत प्रणालीतील त्रुटी आढळून आली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून विमान परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान सुरक्षितपणे परतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दुसऱ्या एअर फोर्स वन विमानातून स्वित्झर्लंडकडे रवाना होतील आणि दावोस येथील दौरा नियोजित प्रमाणे पूर्ण करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ५६ वी वार्षिक परिषद सुरू आहे. ही परिषद १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात दावोस येथेच तिचे आयोजन होते. यंदाच्या परिषदेची थीम “संवादाचा आत्मा” अशी आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत १३० हून अधिक देशांमधील सुमारे ३,००० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तसेच ६० पेक्षा अधिक राष्ट्रप्रमुख आणि सरकारचे नेते या परिषदेला उपस्थित आहेत. जागतिक सहकार्याला चालना देणे, विश्वास निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या समस्या सोडवणे, या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.