नाशिक,
Shiva Telang आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळवण्यासाठी विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये उमेदवारीवरून थेट नेत्यांना जाब विचारल्याचे दृश्य टीव्हीवर झळकले असून, काही ठिकाणी भावनिक वातावरण निर्माण झाले. उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचेही दिसून आले.
विशेषतः नाशिकमध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी आपसात कुरघोडी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीला युतीसाठी प्रयत्न झाले असले, तरी ते यशस्वी ठरले नाहीत. उलट नाशिकमध्ये शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती झाली असून, भाजप या समीकरणाबाहेर राहिल्याचे चित्र आहे.
गंभीर आरोप
दरम्यान, नाशिकमध्ये Shiva Telang एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील इच्छुक उमेदवार शिवा तेलंग यांनी पत्नीसमवेत आत्महत्येचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात त्यांनी आपल्या संभाव्य आत्महत्येस काही पक्षनेते जबाबदार राहतील, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी उमेदवारी वाटपात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला आहे. एका प्रभागात दोन जणांना एबी फॉर्म दिल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित पत्र सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिवा तेलंग संपर्कात नसल्याची माहिती आहे.या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री दादा भुसे यांनी परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, राजकारणात प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देणे शक्य नसते. एका जागेसाठी अनेक इच्छुक असतात आणि त्यातून एकाची निवड करावी लागते. काहींना दुर्दैवाने संधी देता आली नाही, मात्र सुमारे ९५ टक्के शिवसैनिकांनी निर्णय स्वीकारून कामाला सुरुवात केली आहे. युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले, पण ती शक्य न झाल्याचेही त्यांनी मान्य केले.निवडणुकीबाबत आशावाद व्यक्त करताना दादा भुसे म्हणाले की, मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे वीसपेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील, तसेच नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवला जाईल. दरम्यान, उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादांमुळे निवडणुकीपूर्व वातावरण अधिकच तापले असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.