अमरावती,
election-symbols : महानगरपालिकेच्या १५ जानेवारीला होणार्या निवडणुकीसाठी रिंगणातले उमेदवार निश्चित झाले आहे. शनिवारी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी उमेदवारांची अंतिम यादी व त्यांचे निवडणूक चिन्ह जाहीर केले. उमेदवारांनी चिन्ह मिळताच प्रचारला सुरूवात केली आहे.
महापालिकेच्या २२ प्रभागात ८७ जागेसाठी निवडणुक होणार आहे. त्यांसाठी एकूण ६६१ उमेदवार रिंगणात उतरले आहे. त्यात राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षांसह अन्य छोटे पक्ष व आघाड्यांच्या उमेदवारांचा समावेश आहे. नामांकन दाखल केल्यानंतर त्याची छाननी झाली. १ व २ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची मुदत होती. १६१ उमेदवारांनी माघार घेतली. रिंगणात राहीलेल्या ६६१ उमेदवारांना आज चिन्हाचे वाटप झाले. ज्या पक्षांना आयोगाकडून चिन्ह मिळाले आहे, त्यांच्या उमेदवारांना तेच चिन्ह देण्यात आले आहे. ज्यांचे चिन्ह निश्चित नाही, त्यांना आयोगाने ठरवून दिलेल्या नियामानुसार चिन्ह देण्यात आले आहे. आता सर्व उमेदवार प्रचाराला लागले आहे. १३ जानेवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत उमेदवाराला प्रचार करता येणार आहे.
अमरावती शहरात सर्वच ठिकाणी प्रचाराचा धुराळ उडणार आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जाणार आहे. प्रमुख सर्वच पक्षाने प्रचारासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. कर्मचार्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. ८०१ मतदान केंद्रावरच्या तयारी जोरात हाती घेण्यात आली आहे. संवेदनशील भागातही आवश्यक त्या उपायोजना करण्यात येत आहे. मनपा आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी सौम्या शर्मा दररोज अधिकारी व कर्मचार्यांच्या बैठकी घेत असून तयारीला अंतिम स्वरूप देत आहे.