अमरावती,
municipal-corporation-bjp : महापालिकेच्या निवडणुक रिंगणातील सर्व ६८ जागा भाजप संपूर्ण ताकदीने लढविणार असून मित्र पक्षांसोबत मतभेद व मनभेद होईल असा प्रचार करणार नाही. भाजपाचे जास्तीजास्त उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजपचे निवडणूक निरीक्षक आमदार संजय कुटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी खासदार अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन धांडे उपस्थित होते.

निवडणुकीसंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट करत आमदार कुटे म्हणाले, मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभीमान पक्षासोबत अखेरच्या क्षणापर्यंत जुळवून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपने युवा स्वाभीमानला सोडलेल्या सहा जागांवर उमेदवार दिले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय ज्या तिन जागांवर उमेदवार दिलेत तेथील उमेदवारी मागे घेत समर्थन देण्याचीही भूमिका घेण्यात आली होती. अगदी सकारात्मक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. मात्र, अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेल्याने अर्ज मागे घेता आले नाहीत व त्यावर समर्थन जाहीर करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. युवा स्वाभीमानने ४१ उमेदवार उभे केले असून ते मागे घेणे शक्य न झाल्याने अखेर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय काढण्यात आला. या सर्व जागांवर संयुक्त प्रचार करता येणे शक्य नसल्याने स्वतंत्रपणे सामोरे जाऊ.
निवडणुकीत मित्रपक्षांसोबत मनभेद किंवा मतभेद होणार नाहीत, यांची काळजी घेतली जाईल. एकमेकांविरूद्ध टीका करणे किंवा विरोधात शाब्दीक प्रचार केल्या जाणार नाही. भाजप ही निवडणूक गांभीर्याने लढविणार असून गतवेळी जिंकलेल्या ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. शिंदे सेनेबद्दल त्यांनी फारसे भाष्य करणे टाळले. निवडणुकीत हिंदूत्वाच्या मुद्दयावर प्रचार करणार असून सत्ता स्थापन करण्याइतपत जागा स्वबळावर निवडून आणू असा दावाही त्यांनी यावेळी केला.