चंद्रपूर,
chandrashekhar-bawankule : ज्या कार्यकर्त्यांना भाजपाची उमदेवारी मिळाली नाही, त्या सर्वांचा योग्य वेळी आम्ही सन्मान करू, अशी सारवासारव भाजपाचे ज्येष्ठ नेते, विदर्भ व मराठवाड्यातील नऊ महानगरपालिकेचे प्रभारी तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली.
चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रदेश कार्यालयातून आलेली अधिकृत उमदेवारांची यादी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी बदलली. त्याचे खापर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर फोडून त्यांना पदमुक्त केले गेले. या पृष्ठभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपुरात आले होते. त्यांनी सर्व उमदेवारांची बैठक घेतली. या बैठकीला निवडणुकीचे मार्गदर्शक आ. सुधीर मुनगंटीवार, निवडणूक प्रमुख आ. किशोर जोरगेवार, हंसराज अहिर, निरीक्षक चैनसुख संचेती, प्रभारी अशोक नेते, मदन येरावार आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपा व शिवसेना युती आहे. मात्र, प्रभाग क्रमांक 7 (जटपुरा गेट) मध्ये एका जागेसाठी दोन एबी फार्म दिल्या गेल्याने त्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. असे कधीकधी होत असते. भारतीय जनता पार्टी जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरते तेव्हा सारे मतभेद दूर सारले जातात. चंद्रपुरातही दोन्ही ‘बॅट्समॅन’ (येथे आमदार मुनंटीवार व आमदार जोरगेवार असे गृहित धरावे.) मैदानात उतरले आहेत. ते छक्के-चौके लावतील, असेही ते म्हणाले.
सुभाष कासनगोट्टूवार यांच्या हकालपट्टीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, त्याबाबतचे समज-गैरसमज दूर झाले आहेत. त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून काढले गेले ही मोठी कारवाईच आहे. भाजपा व सेना युतीतील समन्वय आणि रविवारी होणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रोड शो’च्या तयारीची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे. उमेवारांची बैठकही झाली आहे. आम्ही चंद्रपूर महानगरपालिकेत 51 टक्के मते घेऊन बहुमताच्या जागा जिंकू आणि विकसित चंद्रपूर महानगराच्या दिशेने विविध योजना राबवू. सध्या चंद्रपूरच्या विकासाचा अजेंडा मांडून आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत आणि निवडणूक जिंकणार आहोत, असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला.
16 जानेवारीनंतर शस्त्रक्रियाः आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कितीही सारवासावर करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना, अधिकृत यादी बदलण्याप्रकरणी येत्या काळात कारवाई निश्चित होईल, असे संकेत दिले. ते म्हणाले, ‘‘एकदा 16 जानेवारीनंतर बिपी, शुगर कंट्रोल झाला की, यासंदर्भात जेव्हा शस्त्रक्रिया सुरू होईल, तेव्हा याबाबतची माहिती मला देता येईल. ‘एबी फॉर्म’ची चोरी झाली ती काही प्रदेशाच्या कमिटी सदस्यांकडून झालेली नाही. आणि अशी तक्रार प्रभारी अशोक नेते व निरीक्षक चैनसुख संचेती यांनी भाजपा प्रदेश कार्यालयाकडे केली आहे. याठिकाणी ज्या पद्धतीने ‘एबी फॉर्म’च्या संदर्भामध्ये कृती केली गेली, ती नेते व संचेती या दोघांनाही मान्य नाही. अशोक नेते यांनी तर राजीनामाही पाठविला होता. ज्या पद्धतीने हे बदल झालेत, त्यामध्ये इतरांचा काहीही दोष नव्हता. एबी फॉर्म भरणार्यांनीही याबद्दलची माहिती दिली आहे, असे सुतोवाच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, 4 जानेवारी रोजी चंद्रपुरात येत असून, सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट या मुख्य मार्गावरून त्यांच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे.