18 व्या शतकातील अभियांत्रिकीचा जिवंत नमुना ‘एचंमपल्ली’ धरण

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
सिरोंचा, 
echampalli-dam : सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत गोदावरी नदीच्या पात्रात उभे असलेले एचंमपल्ली धरण हे आजच्या काळातील घाईघाईने उभारल्या जाणार्‍या बांधकामांवर एक प्रकारचा प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहे. तब्बल दोनशे वर्षांपूर्वी निजामकालीन राजवटीत सुरू झालेले हे धरण आजही आपली मजबुती आणि त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देत उभे आहे. अनेक पूर, वादळे आणि निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात असूनही हे अपूर्ण धरण अजूनही तग धरून आहे.
 
 
 
gad
 
 
 
18 व्या शतकाच्या उत्तरार्धात आजच्या तेलंगाना राज्यातील महादेवपूर परिसरात तीव्र पाणीटंचाई भासत होती. या भागातील शेती आणि दैनंदिन जीवन पाण्यावर अवलंबून असल्याने निजाम शासकांनी गोदावरी नदीवर धरण उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यासाठी सिरोंचा तहसीलमधील आसरअल्ली गावाजवळील गोदावरीचा भाग निवडण्यात आला. कारण या ठिकाणी नदीचा प्रवाह आणि भौगोलिक रचना धरणासाठी अनुकूल होती.
 
 
इ.स. 1806 मध्ये निजामांनी फ्रेंच अभियंत्यांची मदत घेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. त्या काळात वापरलेली दगडी बांधकाम पद्धत, नदीच्या प्रवाहाचा अचूक अंदाज आणि मजबूत पाया ही आजही अभ्यासण्याजोगी बाब मानली जाते. आधुनिक साधनांशिवाय केलेले हे बांधकाम आजही टिकून राहिले आहे, हे त्या काळातील अभियांत्रिकी प्रगल्भतेचे उत्तम उदाहरण मानले जाते.
 
 
मात्र, धरणाचे काम सुरू असतानाच सीमावर्ती भागात प्लेगच्या महामारीने भीषण रूप धारण केले. अनेक गावांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आणि लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या काळात आजसारखी वैद्यकीय माहिती उपलब्ध नसल्याने या महामारीला दैवी कोप मानले गेले. परिणामी, धरणाच्या कामामुळेच ही आपत्ती ओढवली, असा समज लोकांमध्ये पसरला. या समजुतीतून सीमावर्ती गावकर्‍यांनी धरणाच्या कामाला तीव्र विरोध सुरू केला. जनआंदोलन उभे राहिल्याने निजाम प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. अखेर लोकांच्या भावनांचा आदर राखत निजामांनी धरणाचे बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेतला आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अपूर्ण अवस्थेतच राहिला.
 
 
त्यानंतरच्या काळात विविध राजकीय सत्तांदरम्यान हे धरण पुन्हा पूर्ण करण्याबाबत चर्चा होत राहिली. तज्ज्ञांच्या मते, केंद्रात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या धरणाच्या पुनर्बांधणीबाबत प्राथमिक पातळीवर प्रयत्न झाले होते. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने हा विषय पुन्हा थंडावला. अलीकडच्या काळात तेलंगाना सरकारने एचंमपल्ली धरण पूर्ण करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या धरणामुळे शेजारील छत्तीसगड राज्यातील काही भागांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका छत्तीसगड सरकारने घेतली आहे. त्यामुळे आंतरराज्यीय सहमतीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन राज्यांतील मतभेदांमुळे हा प्रकल्प अद्याप रखडलेला आहे.
 
 
दोनशे वर्षांपूर्वी उभारलेली, अपूर्ण असूनही भक्कम असलेली ही रचना आजच्या पिढीसाठी केवळ एक धरण नसून, काळाच्या ओघात हरवलेल्या शाश्‍वत विकासाच्या विचारांची आठवण करून देणारी एक मौन साक्ष आहे.