विजय माहुरे
सेलू,
suhani-nehare : शहरात मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत असताना तेच लोन गाव खेड्यातही पोहोचले आहे. घरातही आता फॅशन म्हणून का होईल ना पण कॅरम पोहोचला. सोबतीला टिव्हीचे जाळे आहेच. गावात शिक्षणासह कोणत्याही सुविधा नसल्याने शहरात जावे लागते. या सर्व व्यापात जंगल व्याप्त गाव असलेल्या बोरी कोकाटे येथील चिमुकलीने लंगडी खेळाला एका उंचीवर नेले. गाव ते राष्ट्रीय स्तरावर तिने बक्षिसांवर ताबा मिळवला. येथे आयोजित लंगडी स्पर्धेतही सुहानी नेहारे चर्चेचा विषय ठरली.

ग्रामीण जंगल व्याप्त भागात राहणारी सुहानी नेहारे हिने गावातीलच उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना वयाच्या सहाव्या वर्षी बीट, केंद्र व तालुका स्तरावर नव्हे जिल्हा स्तरावर लंगडी खेळात वैयतिक पारितोषिक मिळविणे सुरू केले. आता १७ व्या वर्षात सुहानीने प्रवेश केला. राज्य, राष्ट्रीय स्तरावर लंगडी खेळात आपली ओळख निर्माण केली. सेलू येथे क्रीडा युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, जिल्हा लंगडी असोशियशन यांच्या वतीने सेलू येथील दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मैदानावर राज्य स्तरीय लंगडी स्पर्धा सुरू आहे. उद्घाटन सामना नागपूर व पुणे विभागात झाला. यावेळी सुहानीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पाच मिनिटाचा डिफेन्स व आठ गडी बाद केले.
सुहानीने आठव्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले नंतर हिंगणी यशवंत विद्यालयात तर सध्या दीपचंद विद्यालयात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थिनीने जिल्हा लंगडी असोशियनतर्फे होणार्या विविध ठिकाणी होणार्या स्पर्धेत भाग घेतला त्यात विभागीय स्तरावर पाच वेळा, राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत ही खेळण्याचा मान मिळाला. तमिळनाडू, वसई विराट, मुंबई, लातूर, शिर्डी, शेगाव तर मुंबई येथे २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. चंद्रपूर येथे झालेल्या स्पर्धेत राज्यस्तरीय संघात निवड झाली, २०२४ मध्ये लातूर येथील स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली आहे. सेलू येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर, संभाजी नगर, नागपूर, अमरावती, मुंबई,कोल्हापूर, पुणे, नाशिक या आठ विभागातून मुला मुलीचे १६ संघांनी भाग घेतला आहे.
आपल्याला पहिल्या वर्गापासून लंगडी खेळात आवड निर्माण झाली. आपण जिल्हा, विभागीय व राष्ट्रीय स्तरावर भाग घेतला. आता आपल्या गृह तालुयात राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा आयोजित केल्याचा आनंद आहे. येथे तर गावकर्यांचे पाठबळ असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय लंगडी पटू सुहानी नेहारे हिने तरुण भारतला दिली.