गोंदिया,
Gondia car accident गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावर मुरदोली जंगल शिवारात एका अनियंत्रित कारची रस्त्याच्या कडेवरील झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार ३ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. रुपेश नरेश भुगारे (वय २३) रा.पिंडकेपार , ता. गोरेगाव असे मृताचे व प्रफुल्ल ब्रम्हानंद पटले (वय २२) रा. तुमखेडा असे गंभीर जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रुपेश व प्रफुल्ल हे दोघेही डिझायर कार क्रमांक एमएच ३५ ए जी ३९५८ ने भरधाव वेगात राष्ट्रीय महामार्गाने गोरेगावकडून कोहमाराकडे जात असताना गोरेगाव तालुक्यातील मुरदोली जंगल शिवारात चालकाचे कारच्या स्टेयरिंग वरुन नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेवरील एका झाडाला धडक देत शेजारच्या दुसर्या झाडावर धडकली. यात रुपेशचा जागीच मूत्यू झाला. तर प्रफुल्ल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. धडक इतकी भीषण होती की वाहनाच्या समोरील भागाचा पूर्णतः चुराडा झाला. घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक पथक बोलावण्यात आले होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुजित घोलप करीत आहेत.