नाशिक,
ladki bahin yojana लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच, यासंदर्भात शासनाकडून कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा महिला व बालविकास विभागाने दिले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मुदतवाढ नसेल, तर हजारो महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून, ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर होती. ही मुदत आता संपली असतानाच, तांत्रिक अडचणी, इंटरनेट समस्या तसेच कागदपत्रांमधील त्रुटींमुळे अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे समोर आले आहे. परिणामी, या महिलांना पुढील अनुदान मिळणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
सर्व्हर स्लोडाउन
विशेषतः ग्रामीण भागात इंटरनेटची अपुरी सुविधा, सर्व्हर स्लोडाउन आणि कागदपत्रांच्या अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना ई-केवायसी पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे शासनाने पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात या चर्चेला कोणताही अधिकृत आधार नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.शासनाने ई-केवायसीसाठी [https://ladkibahin.maharashtra.gov.in](https://ladkibahin.maharashtra.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, गुरुवारी मध्यरात्रीपासून हे संकेतस्थळ बंद करण्यात आल्याने महिलांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अंतिम मुदतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने दिवसभर संकेतस्थळाचा सर्व्हर स्लोडाउन झाला होता. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांना रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळ पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली.दरम्यान, राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवळ महिलांना खूष करण्यासाठी मुदतवाढीची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही, अशी चर्चा महिलांमध्ये सुरू आहे. संकेतस्थळ बंद करून महिलांची चेष्टा करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही अनेक ठिकाणी उमटत आहेत.या संदर्भात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत होती. सध्या या प्रक्रियेसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही आणि यासंदर्भात शासनाचा कोणताही अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही.
मुदतवाढीबाबत स्पष्ट निर्णय ladki bahin yojana न झाल्यास आणि तातडीने संकेतस्थळ सुरू न झाल्यास, राज्यातील हजारो लाभार्थी महिलांचे आर्थिक सहाय्य थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शासनाने त्वरित स्पष्टता द्यावी, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.