गोंदिया,
murder-case : रागाच्या भरात मुलाची हत्या करणार्या पित्याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी आज, ३ जानेवारी रोजी १० वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. चरणदास केशव नेवारे (६०) रा. मीलटोली/कोसमतोंडी ता.सडक अर्जुनी असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी, त्याची पत्नी व मुलगा राजकुमार उर्फ चमन नेवारे हे एकत्र राहायचे. बापलेक दोघेही मद्यपी होते. मद्यप्राशन केल्यावर त्यांच्यात नेहमीच भांडण व्हायचे व मारहाण करायचे. १३ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजता मद्यधुंद अवस्थेत त्यांच्यात घरासमोरच भांडण झाले. प्रसंगी शेजार्यांनी समजून त्यांना घरी पाठविले. परंतु घरात गेल्यावरही त्यांच्या वाद झाला असता रागाच्या भरात आरोपीने मुलाच्या डोक्यावर कुर्हाडीने वार केले. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी डुग्गीपार पोलिसांनी आरोपीवर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान तत्कालीन पोलिस निरीक्षक एम. बी. जाधव यांनी तपासाअंती आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश चांदवानी यांनी १० साक्षदारांची साक्ष नोंदविली. दरम्यान, आरोपीचे वकील व सरकारी वकील कृष्णा पारधी यांच्या युक्तीवाद, पुरावा व वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्या. आर. एन. जोशी यांनी आरोपीला भादंविच्या कलम ३०४ भाग १ अंतर्गत १० वर्षाचा कारावास व १ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ वर्षाचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.