शेतकर्‍यांची चिंता व्यक्त करणारी पत्रकारिता व्हावी

-प्रकाश दुबे यांचे प्रतिपादन -रामोजी फाऊंडेशनचा विकासात्मक पत्रकारितेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जयदीप हर्डीकर यांचा सत्कार

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
नागपूर,
prakash-dubey : विदर्भातील शेतकर्‍यांचे प्रश्न सातत्याने दुर्लक्षित होत असल्याने शेतकर्‍यांची चिंता व्यक्त करणारी खरी पत्रकारिता व्हावी,असे आवाहन संपादक प्रकाश दुबे यांनी केले. रामोजी फाऊंडेशनच्या पहिल्याच प्रतिष्ठित पुरस्काराने जयदीप हर्डीकर यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात जयदीप हर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रकाश दुबे बोलत होते. यावेळी प्रामुख्याने शेतकरी नेते विजय जावंधिया, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे, विजय सातोकर, रवींद्र रूक्मिणी पंढरीनाथ, शरद आदी उपस्थित होते.
 
 
03jan4333
शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर
 
 
प्रकाश दुबे पुढे म्हणाले, शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना त्याकडे कानाडोळा केल्या जातो. हिवाळी अधिवेशनात सुध्दा त्यावर चर्चा होत नाही. मनपा निवडणूकीच्या नावाने अधिवेशन गुंडाळल्या जाते. तेव्हा नागरिक प्रश्नांकडे सरकार दुर्लक्षित करीत असल्याचे दिसून येते. विधीमंडळात शेतकर्‍यांच्या प्रश्नासोबतच इतर सामाजिक प्रश्न सुटतील, विश्वास मोर्चेकर्‍यांना असतो.विकासात्मक पत्रकारिता करीत असलेल्या पत्रकारांनी स्थानिक प्रश्नाला न्याय मिळवून द्यावा, असेही ते म्हणाले.
 
समस्या सोडविण्यासाठी पत्रकारिता एक दुवा
 
 
सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विकासात्मक पत्रकारिता पुरक ठरते. माध्यमातील समस्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात मोलाची मदत होत असल्याने पत्रकारिता एक दुवा झाला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील मोर्चे कव्हर करीत असताना ग्रामीण भागात अनेक प्रश्न जवळून बघता आले. सरकार दरबारी आपले प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा ठेवून अनेकजण हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढतात. यात प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या प्रश्न सुध्दा असतात. मुळात अन्नदाता असलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नाला वाचा फोडणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत सत्कारमूर्ती जयदीप हर्डीकर यांनी व्यक्त केले.
 
सामाजिक समस्या ओळखणारा चिंतणशील पत्रकार
 
 
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पत्रकारांनी वाचा फोडल्यामुळेच सरकारला प्रकल्पग्रस्तांची दखल घ्यावी लागली. सामाजिक समस्या ओळखणारा चिंतणशील पत्रकार म्हणून जयदीप हर्डीकर याने आपली ओळख निर्माण केल्यामुळे आज त्याला प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याचे गौरव उद्गार विलास भोंगाडे यांनी काढले.