नागपूर,
sanjay-malpani : आधुनिक काळात केवळ गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची वर्गवारी करण्यात येते. अधिक गुण प्राप्त करणाèया मुलांना पालक हुशार समजतात. मुलांचे मन, त्याचे हृदय व हात या तिन्हीच्या समन्वयाने काम करण्याची वृत्ती मुलांमध्ये रुजविणे म्हणजे शिक्षणातील समत्वयोग असल्याचे मत गीता परिवारचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी व्यक्त केले.
सेवासदन शिक्षण संस्थेच्या शतसंवत्सरीय वर्षानिमित्त आयोजित डॉ. वसंतराव व डॉ. कुसुमताई वांकर पुरस्कृत 40 व्या रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. संजय मालपाणी बोलत होते. ‘शिक्षणातील समत्व योग’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सेवासदनच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत व्यासपीठावर उपस्थित होत्या.
डॉ. संजय मालपाणी म्हणाले, सध्या शाळा, कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणात बदल करण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धतीने शिक्षण न देता, मुलांमध्ये असलेल्या कौशल्याचा विचार करून त्याला काम दिल्यास तो कोणत्या क्षेत्रात यशस्वी होईल याचा अंदाज प्राथमिक स्तरावर घेता येतो. ही पद्धत लागू करावी. त्यामुळे जय-पराजय, लाभ-हानी यात सम्यक पद्धतीने विचार करणे मुलांना आत्मसात होते. अशा पद्धतीने मुलांमधील सृजनशीलता विकसित करण्यास वाव देणे आवश्यक आहे. मूळ संकल्पना विविध उदाहरणांसह समजावत त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला.
डॉ. उज्ज्वला चक्रदेव म्हणाल्या की, 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न जे आपण बघितले आहे, ते पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक महिला पूर्णपणे सक्षम होईस्तोवर महिला शिक्षण संस्थांची गरज राहणार आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाची महती सांगताना महर्षी धोंंडो केशव कर्वे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला.
कांचन गडकरी, वासंती भागवत यांनी डॉ. संजय व डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महिषासूरमर्दिनी स्तोत्र म्हटले. प्रा. केतकी भट यांनी प्रास्ताविक केले.