पुलगाव,
devendra-sonatke : येथील केंद्रीय विद्यालयातील शारीरिक शिक्षक व मिहिर अॅवाचे संचालक देवेंद्र सोनटके यांनी ४६ व्या राज्यस्तरीय मास्टर्स स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके प्राप्त केली असून त्यांची आता केरळ येथे होणार्या राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे.
नुकतीच मास्टर्स अॅथलेटिस स्पर्धा वाशिम येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये देवेंद्र सोनटके यांनी ११० मीटर हर्डल्स, थाळीफेक व भालाफेक या तिनही क्रीडा स्पर्धेमध्ये ४५ ते ५० वर्षे वयोगटात सहभाग नोंदवून सुवर्णपदक प्राप्त केले. ते आता केरळमध्ये होणार्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याआधी देवेंद्र सोनटके यांनी मंगलोर येथे पार पडलेल्या एशियन अॅथलेटिस स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्याचप्रमाणे कलकत्ता, पुणे, नाशिक, बंगळुरू अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेमध्ये दरवर्षी सहभाग नोंदवून अनेक पदके प्राप्त केलेली आहेत.
वाशिम येथे पार पडलेल्या ४६ व्या राज्यस्तरीय मास्टर्स स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळपास २०० मास्टर स्पर्धकांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविलेला होता. त्यांच्या या यशाकरिता केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सुनील परदेशी, वर्धा जिल्हा मास्टर्स असोसिएशनचे सचिव कैलाश बाकरे, इंडियन मिलिटरी स्कूल येथील प्रा. प्रवीण शेळके, वर्धा जिल्हा पोलिस दलातील मनीष देशमुख, आशिष देशमुख, देवेंद्र उडान तसेच प्रशांत मेश्राम, रवी देशमुख, हेमंत धानोरकर, सागर वैद्य, विकास पांडे, रितेश पेशने, मनोज हूमने, चंद्रशेखर आझाद व्हॉलीबॉल मंडळ पुलगाव व इतर मित्र मंडळ आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.