तालुकास्तर क्रीडा स्पर्धेत पिंपळापूर शाळेचा प्रथम क्रमांक

पिंपळापूर शाळेने पटकाविले 22 पारितोषिक

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
taluka-level-sports-competition : खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगावअंतर्गत आयोजित तालुकास्तर क्रीडा स्पर्धा जळका येथे पार पडल्या. बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पिंपळापूर शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला, तर वडकी केंद्राला जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान मिळाला. स्पर्धेत वडकी केंद्रातील सर्व शाळांचे सहकार्य लाभले. त्यानिमित्त पिंपळापूर ग्रामवासीयांतर्फे बुधवार, 31 डिसेंबर रोजी गावात विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
y3Jan-Pimpalapur
 
याप्रसंगी सरपंच रवींद्र चौधरी, उपसरपंच किशोर नहाते, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रीती काकडे, सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश शेंडे, सर्व सदस्य, मुख्याध्यापक संदीप कचवे, मंगेश गोडबोले, राहुल बोरुडे, सचिन कांबळे, अजय पांडे, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी या विजय रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
हा विजय सर्व खेळाडूंच्या एकजुटीचा आहे. आमच्या शाळेला तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेत 22 पारितोषिक मिळाले. यापुढेही जिल्हा स्तरावर आम्ही जास्तीत जास्त पारितोषिक घेण्याचा प्रयत्न करू. आमची शाळा खेळातच नाही तर महादीप परीक्षा, नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रेसर आहे. ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ यामध्येही जिल्ह्यात आमच्या शाळेचा तिसरा क्रमांक आला आहे.

- संदीप कचवे
मुख्याध्यापक
जळका येथे तालुकास्तर स्पर्धेत पिंपळापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी चांगले नेतृत्व केले. यात त्यांनी 22 पारितोषिके पटकावली. मी या भागाची जिल्हा परिषद सदस्य राहिलेली असून मला पिंपळापूर गावाबद्दल आणि या सर्कलबद्दल अभिमान वाटतो. शिक्षण समितीची सदस्य असल्यामुळे या शाळेला लागणारी कुठलीही मदत तत्परतेने केली आहे. यापुढेही मी जिल्हा परिषद सदस्य असो किंवा नसो पण या शाळेसाठी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नक्कीच कार्य करत राहील.
- प्रीती संजय काकडे
माजी जिल्हा परिषद सदस्य
वडकी वाढोणा सर्कल