चंद्रपूर,
kidney-sale-case : रोशन कुळे यांच्या किडनी विक्री प्रकरणातील चौकशीतून तामिळनाडूतील त्रिची येथील रुग्णालयातही अनेकांच्या किडनी काढल्याचे समोर आले. त्यामुळे आता या प्रकरणी गठित विशेष तपास दलाने दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंग आणि त्रिचीतील रुग्णालयाचा संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांच्याकडे रॅकेटचे मुख्य संशयित म्हणून मोर्चा वळवला होता. डॉ. सिंगला यांची सोमवारी सुनावणी होणार असून, डॉ. गोविंदस्वामी मात्र अद्यापही हाती लागलेला नाही. पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी दिलेल्या माहितीवरून किडनी विक्री प्रकरणातील मुख्य दलाल ‘डॉ. कृष्णा’ उर्फ रामकृष्ण सुंचू याला अटक करण्यात आली. त्यानंतर मोहालीतून हिमांशू भारद्वाजला अटक झाली आणि त्रिचीच्या रुग्णालयावर तपासाची सूई केंद्रीत झाली. पोलिसांचे एक पथक अजूनही तेथे तळ ठोकून असल्याची माहिती आहे.

डॉ. सिंगला अटक केल्यानंतर दिल्ली येथील न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारीपर्यंत चंद्रपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकार्यांकडे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 1 जानेवारीला डॉ. सिंग उपस्थित झाल्यानंतर त्याला तात्पुरता जामीन देण्यात आला असून, या प्रकरणी आता 5 जानेवारीला सुनावणी होणार आहे. तर, डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची दोन पथके देशातील इतर राज्यात गेली आहेत. त्यामुळे आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. कोलकाता येथील पॅथॉलॉजीमध्ये रोशन कुळे याला सोबत घेवून दोन दिवस चौकशी करण्यात आली असून, त्या ठिकाणीहून काही माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे.
या किडनी विक्री प्रकरणाचे कनेक्शन कंबोडियासह तामिळनाडूत असल्याचे तपासात समोर आल्यानंतर एसआयटीने त्रिचीच्या रुग्णालयाभोवती आपला तपास केंद्रीत केला आहे. दरम्यान, डॉ. सिंग यांच्याकडून ते त्रिचीच्या रुग्णालयात केवळ भेट देण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्रिची येथील रुग्णालयात अनेकांच्या किडनीची शस्त्रक्रिया करून ती विकली गेल्याचे पुरावे गोळा करण्यात डॉ. सिंग यांचा सहभाग कितपत आहे, हे शोधले जात आहे.
उत्तरप्रदेशातील अन्य एका पीडिताची त्रिचीत शस्त्रक्रिया
या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी हिमांशू भारद्वाज याची शस्त्रक्रिया डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांच्या रुग्णालयात झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयात इतरांचीही किडनी काढली गेली असावी, असा संशय ‘एसआयटी’ला आल्यामुळे अधिक चौकशी करण्यात आली. त्यातून उत्तरप्रदेशातील आणखी एक पीडित समोर आला असल्याची माहिती आहे.