बिबट्याने टांगली झाडावर माकडाची शिकार

शेतशिवारात दहशतीचे सावट

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
तिवसा, 
leopard-hunts-monkey : तिवसा तालुक्यातील डेहनी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, चक्क आंब्याच्या झाडावर माकडाची शिकार टांगून ठेवल्याची थरारक घटना ३ जानेवारी रोजी पहाटे समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
 
 
amt
 
डेहनी गावालगत सूर्यगंगा लघुपाट कॅनालच्या कडेला असलेल्या नीलेश राहन यांच्या शेतालगत असलेल्या आंब्याच्या झाडावर माकडाची शिकार अर्धवट खाललेल्या अवस्थेत लटकलेली आढळून आली. बिबट्याच्या सवयीप्रमाणे शिकार सुरक्षित ठिकाणी नेऊन झाडावर टांगली जात असल्याने ही घटना बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याचे ताजे पायाचे ठसे, विष्ठा तसेच माकडाला फरपटत नेल्याचे पगमार्ग स्पष्टपणे दिसून आले. काही अंतरावर झुडपामध्ये फरपटण्याच्या खुणा आढळून आल्या आणि त्याच परिसरात दोन कुत्र्याच्या दोन पिल्लांची शिकार सुद्धा केलेली आढळली. बिबट्या बराच वेळ या परिसरात वावरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
विशेष म्हणजे, निंभोरा येथील अंकुश दिघडे तसेच डेहनी येथील बादल पाडेकर यांनी एक-दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही घटना अचानक घडलेली नसून, बिबट्याचा या भागात नियमित वावर सुरू असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून तिवसा तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला असून अनेक गावांमध्ये नागरिकांनी बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती वनविभागाला दिली आहे. त्यानुसार वनविभागाने तालुक्यातील काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शोधमोहीम सुरू केली असली तरी अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच एस. डब्ल्यू. घोडमारे, वनरक्षक डायरे, वानखडे, जांभे, गवई, मजूर गजानन राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सोबतच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून रात्रीच्या वेळी शेतशिवारात एकट्याने जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.