पुलगाव,
rajesh-bakane : देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात संभाव्य पाणी टंचाईच्या पृष्ठभूमीवर आयोजित कृती आराखडा बैठकीत आ. राजेश बकाने यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यत करीत यापुढे कृत्रिम पाणीटंचाई सहन केली जाणार नाही असे सुनावत नाचणगाव व गुंजखेडा ग्रापं अधिकार्यांची कान उघाडणी केली.
ते नाचणगाव पुलगाव येथील संभाव्य पाणी टंचाई निमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आ. बकाने पुढे म्हणाले की, पाण्याची मुबलक उपलब्धता असताना केवळ अधिकार्यांच्या कामचुकारपणा, नियोजनशून्यता आणि वेळ काढूपणामुळे नागरिकांना विनाकारण कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आ. बकाने यांनी केला. पाणी आहे, योजना आहेत, निधी आहे; मग लोकांना पाण्यासाठी वणवण का करावी लागते? ही टंचाई अधिकार्यांनी निर्माण केली अशा शब्दांत आ. बकाने यांनी अधिकार्यांची कानउघडणी केली.
नाचणगाव व गुंजखेडा परिसरात नागरिकांकडून सातत्याने पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत असून प्रशासन मात्र कागदोपत्री आढावे घेऊन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आ. बकाने यांनी केला. आपण केवळ बैठक घेण्यासाठी बसत नाही. जनतेला पाणी मिळाले पाहिजे, एवढाच आपला अजेंडा आहे. यापुढे पाणीपुरवठ्यात खंड पडला तर संबंधित अधिकार्यांवर थेट कारवाईसाठी आपण मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
बैठकीदरम्यान आ. बकाने यांनी उपलब्ध जलस्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर नादुरुस्त पाईपलाईन व मोटारी तात्काळ दुरुस्त करणे, कायमस्वरूपी उपाययोजना, ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागामध्ये समन्वय वाढवा अशा सूचना अधिकार्यांना दिल्या.
आ. बकाने यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बैठकीतील अधिकार्यांची चांगलीच भंबेरी उडाली. बैठकीला नाचणगाव व गुंजखेडा ग्रामपंचायतीचे अधिकारी तसेच वर्धा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.