वर्धा,
burglary-case : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने अट्टल घरफोडी करणारी टोळी जेरबंद केली असून वर्धा, वरोरा, बुटीबोरी, येथील सहा गुन्हे उघडकीस आणले. चोरट्यांकडून १० लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रोहित चंदनखेडे (२५) रा. विजय लॉनजवळ सावंगी (मेघे) हे घरी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने चोरी केली. चंदनखेडे परिवार एक तासाच घरी परतला असता त्यांना दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता सोन्याची पोत व रोख ४५ हजार हजार दिसले नाही. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेची चमू करीत असताना अट्टल चोरटा विशाल गायकवाड रा. कैकाडीनगर नागपूर याने त्याच्या सहकार्यांसह ही चोरी केल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी नागपूर गाठून विशाल गायकवाड (२४) व त्याचा सहकारी आदीत्य गायकवाड (२०) दोन्ही रा. कैकाडीनगर आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. देवळी, वर्धा, सेवाग्राम, वरोरा, बुटीबोरी येथील ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १० लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पंकज वाघोडे, प्रकाश लसुंते, शेखर डोंगरे. मनोज धात्रक, संजय पंचभाई, हमीद शेख, महादेव सानप, विकास मुंढे, सुगम चौधरी, विनोद कापसे, शुभम राऊत, मंगेश आदे, निखील फुटाणे, अंजली गाडेकर, दिनेश बोथकर, अनुप कावळे, अंकित जिभे, स्मिता महाजन यांनी केली.