हिंगणघाट,
accident-hinganghat : शहरातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील मोहता बगीचा परिसरात भरधाव कार अनियंत्रित होऊन सायकलस्वाराला चिरडत पुढे थेट किराणा दुकानात घुसली. या अपघातात सायकलस्वार शालिक कोल्हे (६०) रा. चिचघाट यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज शनिवार ३ रोजी दुपारी १.३० वाजताच्या घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहता बगीचा परिसरात एम. एच. ४० ए. ७७९ क्रमाकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कारने रस्त्याने जाणार्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. त्यानंतर कारने दोन रस्ते ओलांडत जनित्राला धडक देत उभ्या असलेल्या दुचाकी वाहनाला उडवले. दुचाकीवर चार अल्पवयीन मुले होती. प्रसंगावधान राखत त्यांनी वेळेत उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, पळताना त्यांना किरकोळ दुखापती झाल्या. त्यानंतर कार थेट नवदुर्गा किराणा स्टोअरमध्ये शिरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जनित्राला धडक बसल्यामुळे विद्युत प्रवाहाचा धोका देखील निर्माण झाला. कार चालक व त्याच्यासोबत असलेला युवक हे दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती असून अपघातानंतर ते कार घटनास्थळीच सोडून फरार झाले. कार चालकाची ओळख अद्याप पटलेली नसली तरी सदर कार प्रवीण तोटे रा. हिंगणघाट यांच्या मालकीची असल्याचे समजते.
माहिती मिळताच पोलिस कर्मचारी प्रवीण देशमुख, श्रीकांत खडसे व रविंद्र आडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.