निवडणुकीतील ‘गढुळ’ राजकारण ‘नितळ’ होते तेव्हा!

*पक्षीय द्वेष विसरण्याचा वर्धेत नवा प्रघात

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा, 
election-politics : गेल्या महिन्यात वर्धा जिल्ह्यातील ६ नगर पालिकांच्या निवडणुका झाल्या. सहा पैकी वर्धा आणि देवळी या दोन नगर पालिकांतील निवडणुकांची चर्चा जोरदार होती. वर्धेत अगदी जवळचा तर देवळीत घरातला उमेदवार त्यामुळे या निवडणुका अजूनच तापल्या होत्या. आरोप, प्रत्यारोप झाले. टीकाही झाल्या. मतदारांचे मनोरंजन झाले! वर्धेत काँग्रेसचे सुधीर पांगुळ तर देवळीत अपक्ष किरण ठाकरे विजयी झाले. वर्धेत मात्र निवडणुकीनंतरचे चित्र राजकारणाची हवाच शुद्ध करणारे ठरले!
 
 
lk
 
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे निवडणूक म्हणा वा इतर जाहीर भाषणात कोणावरही टीका टिपन्नी करीत नाहीत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण कोणावरही वैयतिक टीका केली नसल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री फडणवीस हिंगणघाट आणि देवळीत प्रचारासाठी येऊन गेले. वर्धेतच नव्हे तर सर्वत्र भाजपाकडेच तिकीट मागणार्‍यांची लांब रांग होती. त्यातही नगराध्यक्ष जनतेतून निवडून आणायचा असल्याने नगराध्यक्षपदासाठीही भाजपाकडे अनेक इच्छूक दावेदार होते. आरक्षणात काही तर काही स्क्रृटीनीमध्ये (सर्व्हे या गोंडस नावानेे) गळले. शेवटच्या टप्प्यात तीन नावं आली आणि निलेश किटे यांना तिकिटाची लॉटरी लागली. निवडणुकीचा फड चांगलाच रंगत असताना काँग्रेसचे सुधीर पांगुळ या नावाचा मतदारांमध्ये चंचू प्रवेश झाला. परिणामी, निकालात भाजपाचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर गेला.
 
 
निवडणूक काळातील घडामोडी, उमेदवारी अजूनही चघळल्या जात आहेत. आता तर ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या ओल्या पार्ट्यांमध्ये कॉप्शन उमेदवारही ठरून गेले. नववर्षाचे औचित्य साधून सुधीर पांगुळ यांनी पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे, निवडणूक काळात झालेले सर्व मतभेद, कटुता आणि राजकीय वाद बाजूला ठेवत अनेकांनी त्यांच्या विजयाचे अभिनंदन केले. पांगुळ निवडून येऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवणार्‍यांनी निकाल लागताच गुलालही उधळला. विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक गुलदस्ते घेऊन पांगुळ यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निलेश किटे यांनी पराभवाची कोणतीही असुया मनात न ठेवता नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांचे गुलदस्ता देऊन अभिनंदन केले. ही बाब वर्धेतून राजकारणापलिकडची म्हणून नव्याने प्रघात पाडणारी ठरेल, यात दुमत होण्याचे कारण नाही. भाजपाने आपल्या ‘संस्कारा’ची चाहूल या निमित्ताने दाखवून दिली. निवडणूक संपली की राजकारण संपते. राजकीय मतभेद असले तरी नगराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, अशी अपेक्षा वर्धेकरांना आसल्याचे फिरता फिरता कळले.
 
 
वर्धेच्या राजकारणात क्वचित दिसणारा हा सकारात्मक बदल चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतरही नातेसंबंध नितळ ठेवता येतात, हे एक उदाहरण ठरले आहे. या निवडणुकीत काही कॅटल्याही गरम झाल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीतील वातावरण विनाकारणच बदल्याचे ठरत गेले. निकालाने सारे चित्र पालटून टाकले. पांगुळ यांनी नगराध्यक्षपद स्वीकारले, देवदर्शन झाले. स्वच्छतेला सुरूवात झाली. शहराला तब्बल साडे चार वर्षांनंतर नगराध्यक्ष मिळाला. बहुमत भाजपाकडे आणि नगराध्यक्ष काँग्रेसकडे अशी परिस्थिती आहे. शहराचा विकास हेच ध्येय ठेवत खेळीमेळीच्या वातावरणात नगरपालिकेचे कामकाज चालावे. शहरातील बडे अनधिकृत अतिक्रमण पडावे, नगर पालिका प्रशासनाला मालकी हकाच्या जागांसाठी जागृती यावे. शहर निटनिटके आणि स्वच्छ रहावे अशी अपेक्षा
 
 
वर्धेकरांना आहे. मुंबई व्हाया
 
 
दिल्ली असे परंपरागत राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रीय पक्षात वर्धेतून स्वागताचा प्रघात सुरू व्हावा ही वर्धेकरांसाठी उपलब्धी म्हणावी लागेल. आता वाट आहे ती स्वीकृत सदस्यांच्या नावाची! गटनेत्याप्रमाणेच जोर का धका धिरेसे लगे होईल का की दुखावलेल्यांना संधी? जाती पातीच्या राजकारणाला तिलांजली?