सिंदी (रेल्वे),
water-tank-in-gaul : जलजीवन मिशनच्या माध्यमातून नजिकच्या गौळ येथे पाणी पुरवठा योजनेची तयारी करण्यात आली. जलकुंभही सज्ज झाला. घरोघरी नळ जोडणीची कामेही पूर्ण करण्यात आली. मात्र, मागील दोन वर्षांपासून गावकर्यांना एक थेंबही पाणी मिळाले नाही. सध्या हा जलकुंभ शोभेचा ठरत असून कोरडाच पडलेला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासन जलजीवन मिशन योजना राबवित आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये केल्या जात आहे. गावात पाण्याची टाकी सोबत घरोघरी नळ जोडीची कामेही सुरू आहेत. अशीच कामे गौळ (भोसा) गट ग्रामपंचायतमध्येही झालीत. या योजनेअंतर्गत गौळ येथे जलकुंभ उभारण्यात आला. पाणी पुरवठा योजनेसाठी घरोघरी नळ जोडणीची कामेही पूर्ण झाली. मात्र, उभारण्यात आलेला जलकुंभ शोभेचा झाला आहे. दोन वर्षांपासून गावकर्यांना या योजनेअंतर्गत पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. दोन वर्षांपासून गृहिणी त्या कोरड्या नळाकडे आशेने बघून थकल्या. मात्र, समुद्रपूर पंचायत समितीला अद्यापही पाझर फुटला नाही.
या संदर्भात २६ डिसेंबर रोजी प्रदीप नांदे, सुमित मसराम, चंद्रशेखर वरभे, गौरव कंगाले यांनी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना निवेदन सादर करून सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी गौळच्या नळातून पाणी मिळाले नाही, तर आम्ही मतदान करणार नाही, असा इशारा दिला होता. दोन दिवसांपूर्वी आमदार समीर कुणावार यांची भेट घेऊन गौळच्या महिलांनी समस्येचे गांभीर्य समजावून सांगितले. तसेच या समस्येची सोडवणूक होत नसेल तर आम्ही मतदान करणार नाही, असा इशाराही दिला. यावर यथाशीघ्र पाण्याची समस्या निकाली काढू, असे आश्वासन आ. कुणावार यांनी महिलांना दिले. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही गौळ वासीयांनी दिला आहे.