तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
damini-squad : महिलांची सुरक्षा, सन्मान व संरक्षणासाठी यवतमाळ जिल्हा पोलिस दल सातत्याने कार्यरत असून या सुरक्षा उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी 2 जानेवारी रोजी पोलिस मुख्यालय, यवतमाळ येथे ‘दामिनी पथक’च्या नव्या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके उपस्थित होत्या. यवतमाळ येथील महिला नगरसेवकांनी वाहनाला हिरवे झेंडे दाखवून महिलांच्या सुरक्षेकरिता दामिनी पथकाच्या आधुनिक वाहनाचे लोकार्पण केले. दामिनी पथक कार्यरत पोलिसांना दामिनी पथक जॅकेट वितरण करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी, महिलांची सुरक्षा ही पोलिस दलाची सर्वोच्च जबाबदारी असून ‘दामिनी पथका’मुळे महिलांना त्वरित मदत, जलद प्रतिसाद आणि प्रभावी कार्यवाही मिळणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव कटिबद्ध आहे, असे सांगितले.
महिलांसोबत कोणत्याही प्रकारचा छळ, अत्याचार अथवा संशयास्पद घटना घडल्यास त्वरित 112 हेल्पलाईन, पोलिस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, टवाळखोरी, छेडछाड, अश्लील हावभाव व सार्वजनिक ठिकाणी मुलींना त्रास देण्याच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. अशा प्रकारची कृत्ये करणाèयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व तरुणांनी जबाबदार नागरिक म्हणून वागावे, महिलांचा आदर राखावा, असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, यवतमाळ येथील महिला नगरसेवक, पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे, अवधूतवाडी पोलिस निरीक्षक नंदकिशोर काळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव, पोलिस ठाणे लोहाèयाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी, आरपीआय चकाटे, एमटीओ ढवळे, पोलिस विभागाचे अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.