वॉशिंग्टन,
Aloka Dog Viral Video : बौद्ध भिक्षूंचा एक समूह अमेरिकेत शांतीचा संदेश देण्यासाठी पदयात्रा करत असून, या यात्रेत ‘अलोका’ नावाची एक शांत स्वभावाची मादी कुत्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक पावलावर भिक्षूंना साथ देणारी अलोका सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाली असून लोक तिला प्रेमाने “शांतीची कुत्री” म्हणत आहेत. जॉर्जियामधून जाणाऱ्या या शांती यात्रेत अलोका भिक्षूंसोबत शांतपणे चालताना, तर कधी आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसते. तिच्या कपाळावर असलेले हृदयाच्या आकाराचे खास चिन्ह अनेकांचे मन जिंकत आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, अलोकाची ही कथा भारतात सुरू झाली. भारतात ती एक भटकी कुत्री होती आणि एका शांती यात्रेदरम्यान ती बौद्ध भिक्षूंना भेटली. भिक्षूंना सोडून जाण्यास तिने नकार दिला आणि निष्ठेने त्यांच्या सोबत चालत राहिली. हळूहळू ती या यात्रेचा कायमस्वरूपी भाग बनली आणि आज तिची ही निष्ठा अमेरिकेत हजारो मैलांपर्यंत पोहोचली आहे.
सौजन्य: सोशल मीडिया
ही शांती पदयात्रा सुमारे १२० दिवस चालणार असून जवळपास २,३०० मैलांचा प्रवास केला जाणार आहे. बौद्ध भिक्षूंचा हा समूह वॉशिंग्टन डी.सी.कडे जाताना एकूण १० राज्यांमधून प्रवास करणार आहे. जॉर्जियानंतर ही यात्रा जॉर्जियातील एथेंस शहरातून किंवा त्याच्या आसपासून जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या पीस वॉकला डिजिटल माध्यमांवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. फेसबुकवर या यात्रेला ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, इंस्टाग्रामवर ६.१० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अलोकासाठी खास #AlokathePeaceDog हा हॅशटॅगही वापरला जात आहे.
सौजन्य: सोशल मीडिया
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामध्ये सांगण्यात आले की, “२०२६ च्या पहिल्या दिवशी एक मोठा टप्पा गाठला आहे. वॉक फॉर पीसच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजने ५ लाखांहून अधिक फॉलोअर्सचा आकडा पार केल्याची माहिती देताना आम्हाला अत्यंत आनंद आणि कृतज्ञता वाटत आहे.” या यात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांकडून भिक्षूंना आणि अलोकाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळत असून, शांतीचा हा संदेश ऑनलाइन जगातही वेगाने पसरत आहे.
अस्वीकरण: या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया आणि रिपोर्ट्समध्ये केलेल्या दाव्यांवर आधारित आहे. तरुण भारत कोणत्याही दाव्यांची सत्यता पडताळत नाही.